नवी दिल्ली: वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याला भारताच्या ताब्यात सोपवण्यास मलेशियन सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. मलेशियात झाकीर नाईकमुळे काही उपद्रव निर्माण होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला भारताकडे सोपवणार नाही, असे मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महमंद यांनी सांगितले. मात्र, त्यांनी यामागील कारण स्पष्ट करण्यास नकार दिला. झाकीर नाईकमुळे आमच्या देशात कोणतीही समस्या उद्भवत नाही, तोपर्यंत त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आम्हाला कोणतेही स्वारस्य नाही. आमच्या देशाने त्याला कायमस्वरुपी नागरिकाचा दर्जा दिला आहे, असे महाथीर मोहम्मद यांनी सांगितले.
झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेल्या विनंतीवर मलेशिया सरकार विचार करत असल्याची माहिती नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. मात्र, मलेशियन पंतप्रधानांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. झाकीर नाईकनेही निवेदन प्रसिद्ध करुन आपण भारतात परतणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. भारतात परतण्यासंदर्भातील वृत्त निराधार आणि खोटे असून तुर्तास माझा भारतात परतण्याचा बेत नाही. देशातील सरकार निष्पक्ष तपास करण्यास तयार असेल तेव्हाच मी भारतात परतेन, असे झाकीर नाईकने सांगितले होते.
चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करण्यासह बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल आहे. बेकायदा कारवाया करणाऱ्या संघटनेचा सदस्य असणे, फौजदारी कट कारस्थानाचा भाग असणे आणि बेकायदा कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. नाईक सध्या मलेशियात असून त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सरकारने जूनमध्ये मुंबई हायकोर्टात दिली होती.
Malaysian Prime Minister Mahathir Mohamad has said that Zakir Naik will not be sent back to India: The Strait Times (file pic) pic.twitter.com/HqKMItTk09
— ANI (@ANI) July 6, 2018