वॉशिंग्टन : Coronavirus कोरोना व्हायरसच्या या अतिशय आव्हानात्मक काळात या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. त्यातच आता भारत इतर राष्ट्रांसाठी मदतीचा हात देताना दिसत आहे. योदगसाधनेच्या रुपात हा मदतीचा हात दिला जात आहे.
भारतात योगसाधना करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. दैनंदिन जीवनात अनेक अडचणीच्या प्रसंगी ही योगसाधना फायद्याची ठरल्याची अनेक उदाहरणंही आहेत. त्यामुळे आता हीच योगसाधना अमेरिकेसाठीही अनुकरणीय ठरत आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकी हृदयरोग जाणकारांच्या माहितीचा हवाला देत झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार सध्या अमेरिकेतही लॉकडाऊन सुरु आहे. अशा या काळात घरात असणाऱ्या मंडळींसाठी योगाभ्यास फायद्याचा ठरु शकतो. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होणार आहे.
दिला जातोय योगसाधनेचा सल्ला...
‘मेम्फिस वेटरन हॉस्पिटल’मध्ये कार्यरत असणाऱ्या हृदयरोग तज्ज्ञ इंद्रनील बासू यांच्या म्हणण्यानुसार अनेकांना योगसाधना ही केवळ मुद्रांशीच संबंधित असल्याचा समज आहे. पण, मुळात तसं नाही. याचा बहुतांश भाग हा ध्यानधारणा आणि श्वसनप्रक्रियेशीही संबंधित आहे. ज्यामुळे ताणतणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या भीतीदायक आणि ताणावाच्या परिस्थितीमध्ये योगसाधना फायद्याची ठरु शकते.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आणि श्वसनप्रक्रियेतीच अडचणी दूर करण्यासाठी योगविद्येचा अभ्यास करण्याचा सल्लाही दिला जात आहे. घरातल्या घरात राहत सुदृढतेच्या मार्गावर जाण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.