मुंबई, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : Russia Ukraine Crisis : रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत. तर रशियाने सीमेवर टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी आहे. (World War 3 fears as Russia deploys troops to border)
रशियाची यूक्रेन सीमेवर युद्धाभ्यासात अण्वस्त्र सज्ज आहेत. यूक्रेन बंडखोरांचीही प्रचंड दहशत आहे. त्यामुळे यूक्रेन दुहेरी अडचणीत आहे. यूक्रेन सध्या दुहेरी कात्रीत अडकलाय. देशांतर्गत बंडखोरी मोडायची की सीमेवर रशियाचा सामना करायचा असा प्रश्न यूक्रेनला पडलाय. रशियाने हल्ला केला तर बंडखोरही इथे यूक्रेनमध्ये हाहाकार माजवण्याच्या तयारीत आहेत. बंडखोर गट लुगांस्क पिपल्स रिपब्लिक आणि डोनेट्स्क पिपल्स रिपब्लिक यांनी आपली शस्त्र परजली आहेत.
बंडखोर नेता डेनिस पुशिलीन म्हणाला, आता आम्हाला सर्व संघटना एकत्र कराव्या लागतील. माझ्या देशवासियांना मी आवाहन करतो त्यांनी आता आम्हाला साथ द्यावी. यूक्रेन सेना बंडखोरांच्या ताब्यातल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात गोळीबार करत आहे, असा बंडखोरांचा दावा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रशियन समर्थकांचं स्थलांतर सुरू आहे.
आपल्या प्रदेशातून 18 ते 55 वर्षांमधील पुरूषांना बाहेर जाण्यास बंडखोरांनी मज्जाव केलाय. यूक्रेनचे अध्यक्ष कोणत्याही क्षणी बंडखोरांच्या ताब्यातल्या प्रदेशात सैन्य घुसवण्याचे आदेश देतील अशी शक्यता बंडखोरांनी व्यक्त केलीय. मात्र यूक्रेन सरकारने बंडखोरांचे हे आरोप फेटाळले आहेत. बंडखोरांच्या ताब्यातल्या शहरांमध्ये अनेक स्फोट होत आहे असं यूक्रेन आर्मीने म्हटले आहे.
विद्रोही गटांनी 20 हून अधिक गावांत गोळीबार आणि स्फोट घडवल्याचा आरोप आर्मीचा आहे. गेल्या 24 तासांत बंडखोरांनी 66 वेळा सीझफायर व्हायोलेशन केल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर बंडखोरांच्या गोळीबारात एक यूक्रेनचा जवानही शहीद झालाय. दोनच दिवसांपूर्वी डोनेट्स्क या शहराच्या मुख्यालयाजवळ बंडखोरांनी एका कारबॉम्बचा स्फोट घडवला.
यूक्रेन सैन्य अधिकारी ओलेक्सी डैनिलौव म्हणाला, सर्वसामान्यांच्या वस्त्यांवर कोणताही हल्ला आम्ही केलेला नाही. विद्रोही गटांच्या ताब्यातल्या क्षेत्रावर आम्ही लष्करी कारवाई केलेली नाही. आजपर्यंत तरी अशी घटना आम्ही घडवलेली नाही. या दहशतीच्या वातावरणामुळे यूक्रेनचे लोक मात्र प्रचंड त्रस्त आहेत. भीतीचे सावट संपूर्ण यूक्रेनवर आहे. रशियन फौजांना तोंड द्यायचं की देशांतर्गत शत्रूंना थोपवायचं असा प्रश्न यूक्रेनमधील नागरिकांना पडला आहे.