World Population : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर; भारताचा आकडा किती?

48 वर्षांत जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे

Updated: Nov 15, 2022, 03:58 PM IST
World Population : जगाची लोकसंख्या  800 कोटींवर; भारताचा आकडा किती? title=
(फोटो सौजन्य - Reuters)

World Population Prospects 2022 : जगाची लोकसंख्या (world population) आज 8 अब्ज होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे येत्या काही वर्षांत अन्नधान्यासह सर्व मूलभूत गोष्टींची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2022 अहवाल (world population prospects 2022) प्रसिद्ध केला. अहवालानुसार, आज म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जांचा आकडा पार करेल. तसेच 2023 मध्ये भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. यासह, 2030 मध्ये जागतिक लोकसंख्या ही 8.5 अब्जाचा आकडा ओलांडण्याचा अंदाज आहे. 1974 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 4 अब्ज होती. मात्र आता 48 वर्षांनंतर ती 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. 1950 मध्ये जगाची लोकसंख्या फक्त 2.5 अब्ज होती. दरम्यान 2086 या वर्षी जगाची लोकसंख्या 10.6 अब्ज असण्याची शक्यता आहे. (world population will be 8 billion in 2023 India will become the most populous country)

2023 मध्ये भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश 

अहवालातील आकडेवारीवर आज सर्वाधिक 142 कोटी लोकसंख्या ही चीनची आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या ही 141 कोटी आहे. मात्रवर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2022 च्या अहवालानुसार, पुढील वर्षात लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकणार आहे. यासह भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. अहवालानुसार, 2030 मध्ये जागतिक लोकसंख्या 8.5 अब्ज आणि 2050 मध्ये 9.7 अब्ज होण्याची शक्यता आहे.

कामगारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता

जगभराता 2050 च्या आसपास लोकसंख्येची वाढ स्थिर होईल आणि त्यानंतर त्यात घट होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच भारत, चीनसह जगातील अनेक देशांमध्ये येत्या काही दशकांत तरुणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा कामगारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

माता आणि बालमृत्यूमध्ये घट 

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस वाढत्या लोकसंख्येबाबत भाष्य केले आहे. "यावेळी जागतिक लोकसंख्या दिवस हा खूप खास आहे, कारण या वर्षी आपण जगातील 8 अब्जावधीच्या जन्माची अपेक्षा करत आहोत. हा एक मैलाचा दगड आहे. गेल्या काही दिवसांत माता आणि बालमृत्यूमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील सुधारणेचा आनंद साजरा करण्यासाठी हा दिवस आहे," असे गुटेरेस म्हणाले.