सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकाल तर तुरुंगात जाल, सरकारने घेतला मोठा निर्णय

आई-वडिल किंवा इतर कुणी आता लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकू शकत नाहीत. फ्रान्समध्ये तसं एक विधेयक पास करण्यात आलं आहे. या विधेयकानुसार आई-वडीलांकडून मुलांचे फोटो राईट्स काढून घेण्यात आले आहेत

Updated: Mar 22, 2023, 06:50 PM IST
सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकाल तर तुरुंगात जाल, सरकारने घेतला मोठा निर्णय title=
संग्रहित फोटो

Ban on Social Media : सोशल मीडियावर (Social Media) आपल्या गोंडस मुलांचे फोटो (Kids Photos) आई-वडिल शेअर करत असतात. या फोटोंना अनेक कमेंट आणि लाईक्सही मिळतात. पण यापुढे सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकता येणार नाहीत. मुलांचं खासगी आयुष्य जपण्यासाठी फ्रान्समध्ये (France) एक नवीन विधेयक (Bill) मंजूर करण्यात आलं आहे. फ्रान्सच्या संसदेत हे विधेयक पारित करण्यात आलं. या विधेयकानुसार आई-वडील मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतील तर कोर्टाकडून (Court) त्यांना बंदी घातली जाईल आणि दोघांनाही जबाबदार ठरवण्यात येईल.

आई-वडिलांना आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतील तर त्या मुलाच्या वयानुसार त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. इतकंच नाही तर आई किंवा वडीलांपैकी एकाचा मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास विरोध असेल तर कोर्टाकडून त्या फोटोवर बंदी घातली जाईल. मुलांचे फोटो शेअर करण्याचे आई-वडिलांचे हक्क काढून घेण्याचे अधिकार कोर्टाकडे असणार आहे. 

का करण्यात आला आहे कायदा?
आई-वडिलांकडून आपल्या मुलांचं खासगी आयुष्य जपलं जावं हा उद्देश या कायद्यामागे आहेत. सोशल मीडियावर मुलांचे फोटो टाकून फॉलोअर्स वाढवण्याचा आणि पैसे कमवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांना शिक्षा करण्याचीही या कायद्यात तरतूद आहे. मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या फ्रेंच काऊन्सिल ऑफ असोसिएशनने बाल लैंगिक शोषणच्या प्रसाराबाबत युरोपोल आणि इंटरपोलला अलर्ट केलं होतं. त्यानंतर फ्रान्समध्ये यासंबंधी कायदा आणण्याची चर्चा सुरू झाली.

असं विधेययक आणणारा फ्रान्स पहिला देश
फ्रान्सचं हे विधेयक मुलांसाठीचं जगातील पहिलं विधेयक ठरलं आहे. ज्या अंतर्गत सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फ्रान्सच्या या निर्णयाचं बाल मानसशास्त्रज्ञ आणि सोशल मीडिया तज्ज्ञांनी स्वागत केलं आहे. आई-वडिलांच्या विरोधात बोलण्याचं  ज्या मुलांचं वय नसतं अशा मुलांचं खासगी आयुष्य जपण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरु शकतो असं व्हिएन्ना विद्यापीठातील संशोधक अंजा स्टेविक यांनी म्हटलंय. 

लहान मुलांचे फोटो शेअर करणं धोकादायक
लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. एका अभ्यासानुसार सोशल मीडियावर शेअर केलेले लहान मुलांचे 50 टक्के फोटो बाल लैंगिकतेसाठी वापरले जातात. याचा गैरवापर होऊ नये यासाठी आपल्या अकाऊंटवर सुरक्षिततेचे उपाय करणं गरजेचं असल्याचं सायबर तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांचे फोटो अशा प्रकारे टाकावेत ज्यात त्या मुलाचा पूर्ण चेहरा दिसत नाही. लांबून घेतलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करणं जास्त सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.