Travel fairytale village : लहानपणापासून गोष्टी ऐकण्याची सुरुवात होते आणि नकळत याच गोष्टी मनाच्या इतक्या जवळची जागा घेतात की, अनेकदा या गोष्टींमध्ये नकळत अनेकजण स्वत:ला पाहू लागतात. गोष्टींमधील पात्र, गोष्टींमधील ठिकाणं इतकंच काय, तर गोष्टींमधील पात्रांची वेशभूषा आणि स्वभाव या साऱ्याचा अनेकांच्याच जीवनावर परिणाम दिसू लागतो. अशा या गोष्टीत हमखास भेटतं ते म्हणजे गाव. गोष्टीतलं गाव म्हटलं की त्या गावात छानशी घरं, मधूनच जाणारी वाट, खळाळणारे झरे, अरुंद साकव, मध्येच डोलीतून डोकावणारी पक्षी आणि निसर्गानं जणू याच गावासाठी ल्यालेला साज असंच चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं.
गोष्टीत भेटणारं हे गाव एकदातरी पाहा, एकदातरी अनुभवावं असंही अनेकांना वाटत असतं. प्रत्यक्षात काहींना तशी संधीही मिळते. काय कमाल भावना असले नाह ती, जेव्हा तुम्हालाही अशा एखाद्या खऱ्याखुऱ्या गोष्टीतल्या गावाला जाण्याची संधी मिळेल? विश्वास बसत नाहीय? हे खरंय! जगाच्या पाठीवर अशी काही सुरेख गावं आहेत जिथं गेलं असता हे खरंच परिकथेतील गाव असल्याचाच भास तुम्हालाही होईल.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गावाची बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. इथली घरं, निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीतून ओसंडून वाहणारा धबधबा पाहता हे गाव कोणा एका परिकथेतील गावाहून कमी नाही, किंबहुना हेच ते गोष्टीतलं गाव... असंच अनेकजण म्हणत आहेत.
स्वित्झर्लंडमधील टिचिनो इथं असणारं हे आहे फोरोलिओ (Foroglio) गाव. वॅल बोवाना इथं हे गाव वसलं असून, तिथं पोहोचणं किंवा तिथं रहदारी पाहणं वसंत ऋतूमध्येच शक्य होतं. गावात विद्युतपुरवठा बेताचा असल्यामुळं इथं हिवाळा तसा अधिकच त्रासदायक आणि आव्हानात्मक ठरतो. हो, पण पावसानंतर मात्र आव्हानं असूनही इथं येणारे अनेकजण आहेत कारणं, इथं निसर्गाची वेगळीच लीला तेव्हा पाहता येते. हे गाव तिथं असणाऱ्या 110 मीटर उंचीच्या प्रचंड धबधब्यामुळंही ओळखलं जातं. दुहेरी वळणांच्या एका पुलावरून या गावात पोहोचता येतं. असं म्हणतात की या गावाला जोडणारा हा पूल 17 व्या शतकातील आहे.
या गावात आल्यानंतर बऱ्याच मंडळींचं भान हरपतं. कोणी इथल्या सौंदर्याची तुलना एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाशी करतं, तर कोणी नुसतंच या गावातील सृष्टीसौंदर्याला न्याहाळताना दिसतं. परदेशवारीचा आणि त्याहूनही स्वित्झर्लंडला भेट देण्याचा कधी योग आला, तर या परिकथेतील गावा भेट द्यायला विसरू नका असंच अनेक भटकंती करणारी मंडळी आवर्जून सांगतात. मग, तुम्ही कधी जाताय या गावा?