Who is Bushra Bibi: पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेनंतर मंगळवारी पाकिस्तानात हिंसाचार उसळला आहे. इस्लामाबाद हायकोर्टातून अटक (Imran Khan Arrest) केल्यानंतर इम्रान खानच्या समर्थकांनी जोरदार हल्लाबोल करत अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (SC of Pakistan) इम्रान खान यांचा जामीन मंजूर करत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा 'मार्शल लॉ'च्या दिशेने जात असल्याचं दिसतंय. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे? बुशरा बीबी (Bushra Bibi) कोण आहेत? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) लंडनमध्ये होते, त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (General Asim Munir) हेही कतारहून परतले आहेत. त्यामुळे आता बुशरा बीबी यांच्यावर कारवाई होण्याची तीव्र शक्यता आहे. बुशरा बीबी (Who is Bushra Bibi) या इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेण्याच्या 6 महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं होतं.
अल कादिर ट्रस्ट (Al Qadir Trust Case) प्रकरण, ज्यामुळे इम्रान खान यांना अटक झाली, ते पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील सोहावा भागात सूफीवादासाठी अल-कादिर विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा या अल कादिर ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. या विद्यापीठात 6 वर्षात केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. त्यानंतर प्रकरण वादात आहे.
आणखी वाचा - Imran Khan Arrested: इम्रान खान यांना अटक! पाक रेंजर्सने कोर्टाबाहेरुन घेतलं ताब्यात
बुशरा बीबी या पंजाबमधील एका प्रभावशाली राजकीय परिवारातील आहेत. बुशरा बीबी यांची बहीण इम्रान खानच्या पीटीआय या राजकीय पक्षाची सदस्य होती, त्यानंतर इम्रान खान यांच्याशी बीबी यांची ओळख झाली आणि पुढे प्रकरण नवरा बायकोच्या नात्यात बदललं. पाकिस्तानी बिझनेसमॅन मलिक रियाझ यांनी याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर इमरान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती.
Imran Khan footage in the Supreme Court. pic.twitter.com/37iq4QjAqL
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) May 11, 2023
दरम्यान, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आमेर फारूक यांनी इम्रान खानच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केलेत. त्यावेळी त्यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादच्या पोलीस प्रमुख यांना इम्रान खान यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. इम्रान खान यांना आता हजर करण्यात येणार असल्याने पाकिस्तानात जोरदार राडा सुरू झाला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात काय होणार? पुन्हा मार्शल लॉ लागणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.