डोनाल्ड ट्रम्प पत्रकारावर संतापले; म्हणाले....

तू एक उद्धट माणूस आहेस.

Updated: Nov 8, 2018, 11:27 AM IST
 डोनाल्ड ट्रम्प पत्रकारावर संतापले; म्हणाले.... title=

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भर पत्रकार परिषदेत सीएनएन वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी हुज्जत घालतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या प्रसंगानंतर व्हाईट हाऊसने सीएनएन वृत्तवाहिनीचे पत्रकार जिम अॅकोस्टा यांचे ओळखपत्रही जप्त केले. या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एरवीही डोनाल्ड ट्रम्प प्रसारमाध्यमांशी फटकून वागताना दिसतात. 
 
 याचाच प्रत्यय या पत्रकार परिषदेत आला. जिम अॅकोस्टा यांनी ट्रम्प यांना विस्थापितांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ट्रम्प यांनी तुम्ही वृत्तवाहिनी चालवा, मला देश चालवू दे, असे उत्तर देत अॅकोस्ट यांना शांत बसवायचा प्रयत्न केला. 
 
 मात्र, त्यानंतरही अॅकोस्टा यांनी आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रम्प यांच्या संतापाचा पारा चढला. यावेळी व्हाईट हाऊसमधील एका कर्मचाऱ्याने अॅकोस्टा यांच्या हातातून माईक काढून घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अॅकोस्टा त्याला बधले नाहीत. 
 
 त्यांनी २०१६ साली झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या अप्रत्यक्ष सहभागाबद्दल ट्रम्प यांना छेडले. तेव्हा ट्रम्प अॅकोस्टा यांच्यावर घसरले. तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही, तू एक उद्धट माणूस आहेस, असे ट्रम्प यांनी म्हटले. 
 
 या प्रसंगानंतर व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्यासाठीचे ओळखपत्र अॅकोस्टा यांचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. अॅकोस्टा यांनी व्हाईट हाऊसमधील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. 
 
 मात्र, अॅकोस्टा आणि अन्य पत्रकारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या अनेकांनी अॅकोस्टा यांनी महिला कर्मचाऱ्याशी कोणतेही गैरवर्तन न केल्याचे सांगितले.