मुंबई : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे परदेश दौरे अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. शेजारी राष्ट्राचा परखड शब्दांमध्ये समाचार घेणं असो किंवा मग एखाद्या राष्ट्रासोबत असणारे मैत्रीपूर्ण संबंध जपणं असो.
प्रत्येक बाबतीत स्वराज आपली छाप सोडतातच. पण, सध्याचा त्यांचाय आखाती राष्ट्रांचा दौरा मात्र एका वेगळ्याच कारणाचे चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वराज यांचा हा दौरा चर्चेत आला आहे, तो म्हणजे कुवेतच्या एका गायकामुळे. मुबारक-अल-रशिद असं त्या गायकाचं नाव असून त्याने स्वराज यांच्यासमोर आपल्या कलेचा नजराणा सादर केला.
रशिदने सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडीचं 'वैष्णव जन तो...' या भजनाचे सूर आळवले.
मुख्य म्हणजे त्याने ज्या आत्मियतेने हे गीत गायलं ते पाहता फक्त उपस्थितांनीच नव्हे तर, खुद्द स्वरात यांनीही त्याचं कौतुक केल्याचं सोशल मीडियावरव पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
#WATCH: Kuwaiti singer Mubarak Al-Rashid sings the favourite bhajan of Mahatma Gandhi `Vaishnav Jan to Tene Kahiye’ during an event in Kuwait, in the presence of EAM Sushma Swaraj. pic.twitter.com/aKqy1HM2hn
— ANI (@ANI) October 30, 2018
सुषमा स्वराज या चार दिवसांच्या आखाती राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून, आता येत्या काळात त्यांच्या या दौऱ्यातून आणखी कोणती माहिती समोर येते, काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.