एका कलिंगडमुळे द्यावे लागणार ५० कोटी रुपये

कलिंगड खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र, कलिंगडामुळे पैसे मिळाले तर...  

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 12, 2017, 07:07 PM IST
एका कलिंगडमुळे द्यावे लागणार ५० कोटी रुपये  title=
Representative Image

अलबामा : कलिंगड खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. मात्र, कलिंगडामुळे पैसे मिळाले तर... आश्चर्य वाटतयं ना? पण असं खरोखर झालयं.  कलिंगडामुळे एका व्यक्तीला ५० कोटी रुपये मिळाले आहेत.

अमेरिकेतील अलबामा येथील वॉलमार्ट स्टोअरला एका कलिंगडसाठी ७५ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ५० कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

झालं असं की, एक माजी सैनिक वॉलमार्टमध्ये कलिंगड खरेदी करण्यासाठी दाखल झाला. मात्र, त्याच दरम्यान तो पडला आणि त्याच्या कमरेला दुखापत झाली. त्यानंतर न्यायालयाने या माजी सैनिकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश वॉलमार्टला दिले आहेत. त्यामुळे वॉलमार्टला ५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. 

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सेवानिवृत्त झालेल्या हेनरी वॉकर जुन २०१५ मध्ये अलबामामधील वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी दाखल झाले.

या दरम्यान, कलिंगड खरेदी करत असताना त्यांचा पाय लाकडाच्या फळीत अडकला आणि ते खाली पडले. खाली कोसळल्याने हेनरी वॉकर यांचं एक हाड तुटलं.

हेनरी वॉकर यांच्या वकीलाने सांगितले की, या दुखपतीमुळे वॉकर यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. दुखापतीपूर्वी वॉकर आठवड्यातून तीन दिवस बास्केटबॉल खेळत होते मात्र, आता त्यांना चालण्यासाठीही वॉकर घ्यावा लागत आहे.

न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायाधिशांना  स्टोअरचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्या व्हिडिओत दिसत होतं की, अनेक ग्राहकांचा पाय त्या लाकडांच्या फटीत अडकला ज्या ठिकाणी वॉकर यांचा पाय अडकला आणि ते खाली कोसळले होते.

या प्रकरणी वॉलमार्टने प्रतिक्रिया देत म्हटलं की, डिस्प्लेमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नाहीये. संपूर्ण अमेरिकेत अशाच प्रकारचे डिस्प्ले लावण्यात आले आहेत. हेनरी यांच्या निष्काळजीपणामुळेच ते खाली पडले आणि जखमी झाले.