काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती- डोनाल्ड ट्रम्प

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझी मदत मागितली होती.

Updated: Jul 22, 2019, 11:29 PM IST
काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती- डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. रॉयटर्स वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी म्हटले की, काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझी मदत मागितली होती. त्यामुळे मला भारत-पाकिस्तान यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करायला आवडेल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून दोन्ही नेत्यांना काश्मीर प्रश्नाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी ट्रम्प यांनी हे विधान केले. मात्र, यानंतर व्हाईट हाऊसकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ट्रम्प यांचे हे विधान वगळण्यात आले.  मात्र, भारताकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, भारताने हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत कोणत्याही तिसऱ्या देशाला यामध्ये हस्तक्षेप करू देण्यास ठाम नकार दिला होता.