वॉशिग्टंन : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा कल ट्रम्प यांच्या बाजुने लागताना दिसत नाहीय. आतापर्यंत लागलेल्या निकालानुसार बायडेन यांन २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट मिळाली आहेत. बायडेन विजयापासून केवळ ६ इलेक्टोरल व्होट दूर आहेत. बायडेन यांनी आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. बहुमतासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. बायडेन यांचा व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचण्याचा रस्ता स्पष्ट दिसतोय. असे झाल्यास या विजयाला ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील. या दरम्यान ट्वीटरने ट्रम्प यांना धक्का दिलाय.
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अनेक ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अनेक तास त्यांच्या ट्वीटवर कोणी कमेंट करु शकत नाही किंवा रिट्वीट देखील करु शकत नाही. निवडणूक निकालांवर प्रश्न उपस्थित करणारे ट्विट ट्रम्प यांनी केले होते. 'धोकेबाजी थांबवा' असे यात म्हटले होते. याला ट्विटरने दिशाभूल ठरवले आहे. हे ट्विट पाहीलं जाऊ शकतं पण लाईक किंवा कमेंट केली जाऊ शकत नाही.
याआधी ट्रम्प यांच्या आणखी एका ट्विटवर ट्विटरने कारवाई केली होती. बायडेन यांच्या सर्व दाव्यांना आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ. हा मतदार आणि राज्य निवडणूक आयोग धोकेबाज आहे. आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत. मीडियाने पाहा. आम्हीच जिंकू. अमेरिका फर्स्ट ! असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांना आपलं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून समर्थन मिळवायच आहे. दरम्यान ट्वीटरची ही कारवाई ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जातोय.
पाच राज्यांत अजूनही मतमोजणी सुरूय. नेवाडामध्ये बायडेन यांनी ट्रम्प यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे. नेवाडा राज्यात बायडन विजयी झाल्यास त्यांना त्याठिकाणाहून ६ इलेक्टोरल व्होट्स मिळतील. नेवाडामध्ये बायेडन विजयी झाल्यास ते बहुमताचा आकडा गाठू शकतात. तर दुसरीकडे चार राज्यातल्या मतमोजणीत डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. त्या चार राज्यात विजय मिळाल्यास ट्रम्प यांना २६८ व्होट्स मिळू शकतील. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया, मिशिगन, विस्कॉन्सिन तसेच पेन्सिलव्हेनियामधल्या मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे.
मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत ते कोर्टात गेलेत. मिशिगनमध्ये १६ इलेक्टोरल व्होट्स आहेत. याठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांचा विजय झालाय. त्याशिवाय विस्कॉन्सिनमधल्या मतमोजणीवरही ट्रम्प यांनी आक्षेप घेतलाय. याठिकाणी १० इलेक्टोरल व्होट्स आहेत. याठिकाणीही डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन विजयी झालेत. पेन्सिलव्हेनियाच्याही मतमोजणीवरून वाद निर्माण झालाय. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. आता व्हाईट हाऊसची ही फाईट कोण जिंकतं याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी अजूनही सुरुच आहे. डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडेन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होटस मिळाले आहेत. व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी त्यांना अजून सहा मतांची आवश्यकता आहे. असोसिएटेड प्रेसनुसार एरिझोना, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये बायडेन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. ही तिन्ही राज्य त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहेत.
नेवाडामध्येही बायडेन सरशी साधू शकतात असा अंदाज आहे. सहा मते बायडेन यांना नेवाडामधून मिळू शकतात. पण आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, काल ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत मतमोजणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात जाण्याची धमकी दिली होती.
दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असताना दुसरीकडे सुरक्षेसंदर्भातील चिंता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडेन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळाले.