कुंटणखान्यात अभ्यास ते 400 पार जागांवर विजय... ब्रिटनचे नवे PM स्टार्मर आहेत तरी कोण?

Who Is Keir Starmer New British PM: वडिलांनी ज्या पक्षापासून प्रेरित होऊन पक्षप्रमुखांच्या नावाने मुलाचं नाव ठेवलं तोच मुलगा त्या पक्षाचा प्रमुख होत पुढे देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा प्रवास एखाद्या स्वप्नाप्रमाणेच म्हणावा लागेल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2024, 08:27 PM IST
कुंटणखान्यात अभ्यास ते 400 पार जागांवर विजय... ब्रिटनचे नवे PM स्टार्मर आहेत तरी कोण? title=
14 वर्षानंतर ब्रिटनमध्ये सत्तांतर (फोटो- हिंदू मंदिरात देवदर्शनासाठी गेलेले किअर स्टार्मर)

Who Is Keir Starmer New British PM: ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ब्रिटनच्या जनतेनं 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्वेटीव्ह पार्टीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ब्रिटनने आपला कौल लेबर पार्टीच्या बाजूने देत बहुमताने देशाच्या सत्तेच्या चाव्या लेबर पार्टीकडे सोपवल्या आहेत. त्यामुळे आता लेबर पार्टीचे प्रमुख किअर स्टार्मर हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. स्टार्मर पंतप्रधान होणं ही ब्रिटनच्या दृष्टीने फारच खास बाब मानली जात आहे. यामागे काही विशेष कारणं आहेत ही कारणं होती ते पाहूयात...

सर्वसामान्य वर्गातून मोठा झालेला चेहरा

स्टार्मर हे सर्वसामान्य वर्गातून मोठा झालेला चेहरा म्हणून ओळखले जातात. देशातील पिछाडलेल्या वर्गातून, गरीब कुटुंबातून पुढे आलेला हा तरुण संविधानाने दिलेल्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या स्टार्मर यांना एकेकाळी अशी वेळही पहावी लागली होती जेव्हा त्यांना कुंटखान्याच्या छप्परावर बसून अभ्यास करावा लागला होता. स्टार्मर यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये आपण बदलासाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. "बदलाला इथूनच सुरुवात होते. कारण ही तुमची लोकशाही आहे. हा तुमचा समाज आणि तुमचं भविष्य आहे. तुम्ही मतदान केलं आहे. आता वेळ आली आहे की आम्ही काही करुन दाखवलं पाहिजे," असं स्टार्मर म्हणाले.

वडील हत्यारं बनवायचे तर आई होती नर्स

किअर स्टार्मर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1962 रोजी लंडन शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील हत्यारं बनवायचे तर आई परिचारिका म्हणून काम करायची. स्टार्मर यांचे वडील रोडने स्टार्मर हे डाव्या विचारसरणीचे होते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव लेबर पार्टीचे संस्थापक किअर हार्डी यांच्या नावावरुन किअर स्टार्मर असं ठेवलं. आज तेच किअर स्टार्मर लेबर पार्टीचे प्रमुख असून पंतप्रधान होणार आहेत. किअर स्टार्मर यांना दोन मुलं आहे.

शाळेत एवढे हुशार होते की...

किअर स्टार्मर यांचं बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये गेले. त्यामुळेच ते स्वत:ला 'वर्किंग क्लास ब्रॅकग्राउण्ड'चा आहे, अशी ओळख करुन देतात. त्यांनी 11 पर्यंतचं शिक्षण रिगेट ग्रामर स्कूलमधून घेतलं. ते अभ्यासात फार हुशार असल्याने स्थानिक नगरसेवक त्यांच्या शाळेची फी भरायचा. ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतानाच त्यांनी खेळांमध्ये आणि संगीत श्रेत्रातही उल्लेखनिय चमक दाखवली. त्यांना यामुळेच सुपर बॉय म्हणून ओळखलं जायचं.

आईला दुर्धर आजार

किअर स्टार्मर यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये माझं वडिलांशी पटायचं नाही असं सांगितलं आहे. मात्र आई जोसेफिनबरोबर आपलं फार छान भावनिक नातं होतं, असंही किअर स्टार्मर सांगतात. त्यांच्या आईला एक दुर्धर आजार झाला होता. या आजारामुळे त्यांच्या आईला उभं राहता येत नव्हतं. त्यामुळेच किअर स्टार्मर यांचं बालपण फार हालाखीचं गेलं. आईने वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत या आजाराला तोंड दिलं. आईच्या मृत्यूच्या काही काळ आधी तिची हाडं एवढी नाजूक झालेली की थोडा दाब आला तरी ती तुटायची, असंही किअर स्टार्मर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. किअर स्टार्मर यांच्या आईला यामुळे होणाऱ्या वेदनांमुळे त्यांचे पाय कापावे लागले होते. मात्र अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना त्रास होत राहिला. आईच्या या अवस्थेमुळे किअर स्टार्मर हे प्रबळ इच्छाशक्ती असणारे व्यक्ती म्हणून उदयास आले.

वकील म्हणून केली सुरुवात

किअर स्टार्मर यांनी आपल्या करिअरची सुरुवात वकील म्हणून केली. खास करुन मानवाधिकाराशीसंबंधित प्रकरणं ते हाताळायचे. सरकारी वकील झाल्यानंतर त्यांनी फोन हॅकिंग घोटाळ्यांसारखे हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणात आले. किअर स्टार्मर हे वयाच्या 52 व्या वर्षी 2015 मध्ये होलबोर्न आणि सेंट पॅनक्रॉसमधून खासदार म्हणून निवडून आले. आधी त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे नाकारण्यात आलं. मात्र स्थिर आणि व्यवस्थापकीय दृष्टीकोन यामुळे अल्पावधित ते लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले.

थेट पक्षप्रमुख झाले

किअर स्टार्मर हे खासदार झाल्यानंतर 2 वर्षांमध्येच लेबर पार्टीने ब्रेक्झिट स्पोकपर्सन म्हणून जबाबदारी सोपवली. त्यांनी लेबर पार्टीचे प्रमुख जेरेमी कार्बिन यांच्या नेतृत्वाखील ब्रेग्झिट सचिव म्हणूनही काम केलं. ब्रेग्झिट यूरोपियन युनियनमधून ब्रिटनला वेगळं करण्याची प्रक्रिया होती. सन 2019 मध्ये निवडणुकीत लेबर पार्टीला मिळालेल्या पराभावनानंतर किअर स्टार्मर यांनी पक्षाचे नेते म्हणून जेरेमी कार्बिन यांना आव्हान देत 2020 मध्ये पक्ष प्रमुख म्हणून निवडून आले. 

400 पार करुन दाखवलं

किअर स्टार्मर यांनी 2020 मध्ये लेबर पार्टीमध्ये प्रमुख म्हणून काम पाहताने पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेल्या कामामुळे ब्रिटनने पक्षाच्या बाजूने मतदान केलं. 2019 मध्ये 205 जागा जिंकणाऱ्या लेबर पार्टीला यंदाच्या निवडणुकीमध्ये आवश्यक असलेल्या 326 जागांचा टप्पा ओलांडून किअर स्टार्मर यांनी 400+ जागा मिळून दिल्या. बातमी हाती येईपर्यंत लेबर पार्टीला 411 जागा मिळाल्या असून कंझर्व्हेटीव्ह पार्टीला 119 जागा मिळाल्या आहेत.

'सर' पदवी वापरत नाहीत

किअर स्टार्मर हे फार प्रॅक्टीकल नेते म्हणून ओळखले जातात. समाजवादी विचारसरणीने प्रेरित असलेले किअर स्टार्मर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यास प्राधान्य देतात. राजकारणामध्ये सेवाभावा पुन्हा आला पाहिजे असं किअर स्टार्मर यांनी आपल्या प्रचारात अनेकदा म्हटलं आहे. स्टार्मर यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाइटची उपाधी दिली आहे. मात्र किअर स्टार्मर हे मुद्दाम त्यांना देण्यात आलेली 'सर' ही पदवी वापरत नाहीत.

फारच रंजक आहेत आश्वासने

किअर स्टार्मर यांनी ब्रिटनमधील आरोग्य सेवा एनएचएसअंतर्गत रुग्णांची दिर्घ वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी एक निश्चित ध्येय समोर ठेवलं आहे. त्यासाठी दर आठवड्यात एनएचएसमध्ये 40 हजार नियुक्त्या केल्या जाणार आहेत. निधीवरील करचोरी रोखण्याचा यामागे उद्देश आहे. छोट्या बोटींमधून ब्रिटनमध्ये घुसखोली करण्याच्या प्रयत्नात प्राण गमावणाऱ्या बेकायदेशीर विस्थापितांना रोखण्यासाठी बॉर्डर सिक्युरीटा कमांट लॉन्च केली जाणार आहे. देशामध्ये 15 लाख घरं उभारली जाणार आहेत. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य तत्वावर ही घरं विकली जाणार आहेत. देशभरामध्ये शिक्षकांच्या 6500 जागा भरल्या जाणार आहेत. खासगी शाळांना दिली जाणारी करसवलत बंद केली जाणार आहे.