मुंबई : अशा घटना आधीपण झाल्या आहेत, आतापण होत आहेत आणि यापुढे ही बहुदा होतील. उबेर इट्स ड्रायव्हर ग्राहकाचं पार्सल जेवण खाताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ड्रायव्हर ग्राहकाच्या जेवणावर चांगलाच ताव मारताना दिसत आहे. (Uber Eats driver gets caught stealing portion of customer food on camera, loses job)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत उबेर ड्रायव्हर ग्राहकाने मागवलेल्या नूडल्समधील काही नूडल्स दुसऱ्या प्लास्टिक कंटेनरमध्ये काढताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा संपूर्ण प्रकार हा तरूण रस्त्यावर एका ठिकाणी बसून करत असल्याचं आढळलं.
यानंतर तो ग्राहकाच्या जेवणातील दुसरा कंटेनर देखील उघडतो. त्यामधील चिकनचे तुकडे तो आपल्याकडील नूडल्सवर ठेवतो. यानंतरचा प्रकार धक्कादायक आहे. आपल्याला हवे तेवढे अन्न काढल्यानंतर ड्रायव्हरने हाताची बोटे चाटली आणि तो पिशवी बंद करण्यासाठी स्टॅपलरच्या शोधात दिसला.
हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर टिकटॉकर @sarahfromflorida यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिली आहे की,'हे मी बघू शकलो नसतो तर बर झालं असतं.' हा व्हिडीओ सराहच्या मित्रांने शूट केला आहे. उबेर ड्रायव्हर काहीतरी वेगळं करत असल्यामुळे त्याने हा व्हिडीओ शूट केला.
त्या मित्राने उबेर ड्रायव्हरला त्यावेळी हटकलं नाही. पण या संपूर्ण प्रकरणाची उबेर इट्स आणि रेस्टॉरंटकडे तक्रार केली. यानंतर उबेरच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, त्या चालकाला कामावरून काढून टाकलं आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा उबेर इट्स ड्रायव्हरबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या अगोदर भारतातही अशा घटना घडल्या आहेत.