Morocco Earthquake : शुक्रवारी उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये (Morocco) 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंप (Earthquake) झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे तब्बल 2000 लोकांचा जीव गेला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, हा भूकंप व्हिडिओ मोरोक्कोमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कल्पना करू शकता की अल्पावधीतच इथे किती विध्वंस झाला असेल.
शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल 2000 लोकांचा जीव गेला आहे. भूकंपामुळे माराकेश या ऐतिहासिक शहरापासून ऍटलस पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावांपर्यंत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत देऊ केली आहे. दुसरीकडे बचाव कर्मचार्यांना दुर्गम बाधित भागात पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भूकंपानंतर घरात झोपलेले लोक बाहेर पळू लागले. असेच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक इमारतीबाहेर बसलेले दिसत आहेत. त्याच वेळी भूकंप होतो आणि जमिनीसह इमारत जोरदार हादरते. भूकंप जाणवताच लोक तिथून पळू लागतात. व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावताना दिसत आहेत. भूकंपाच्या धक्क्यामुळे काही लोक रस्त्यावरही पडले होते. व्हिडिओच्या शेवटी, भूकंप इतका जोरदार होता की इमारतीचा काही भाग देखील कोसळला.
CCTV footage shows glimps of the horrors experiencing a 6.8 magnitude earthquake.
Morocco was struck reports claim well over 600 casualties so far...
Heartbreaking. May Allah SWT bring them ease.#Morocco #earthquake #moroccoearthquake pic.twitter.com/EaMkjkfoC0
— Robert Carter (@Bob_cart124) September 9, 2023
दरम्यान, मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान शहराबाहेरील जुन्या वस्त्यांचे झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. माराकेशमध्ये युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे त्याच ठिकाणी मोठे नुकसान झालं आहे. अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली होती.
भूकंपग्रस्त मोरोक्कोच्या मदतीसाठी अल्जेरिया पुढे आला आहे. अल्जेरियाने भूकंपग्रस्त मोरोक्कोला मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. अल्जेरियाच्या राष्ट्रपती कार्यालयानेही शनिवारी या संदर्भात एक घोषणा केली. मोरोक्कोसोबतचे संबंध बिघडले असतानाही अल्जेरियाने हे पाऊल उचलले आहे.