न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक टीकाकारांना ट्विटरवर ब्लॉक केले होते. मात्र, न्यायालयाच्या एका आदेशानंतर आता टीकाकारांना अनब्लॉक करण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली आहे.
टीका केली म्हणून कुणालाही ब्लॉक करणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्तीसाठी योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. रिअल डोनाल्ड ट्रम्प या ट्विटर अकाऊंटवरून अनेकांना ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे या ट्विटर अकाऊंटवरून ब्लॉक केलेल्यांना अनब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.