मुंबई : आयुष्यात एकदातरी आलिशान हॉटेलमध्ये राहावं, तेथे मनमुराद खावं, मऊ गादीवर झोपावं, मस्त एन्जॉय करावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण कल्पनांचे कितीही मनोरे रचले तरी या गोष्टी फुकट मिळत नाहीत तर त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते. पण चीनमधल्या एका माणसाला मात्र याची वेगळ्याच प्रकारे ‘किंमत’ चुकवावी लागली.
हा माणूस एका हॉटेलमध्ये राहत होता. हॉटेलमधील वास्तव्यात हॉटेलने त्याला भलं मोठं बिल दिलं. बिलाची भलीमोठा आकडा पाहून त्याला घाम सुटला. बिल चुकवण्याइतके पैसे त्याच्याकडे नव्हते. तेव्हा त्याने हॉटेलमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न पुरता फसला. पळून जाण्यासाठी त्याने १९ व्या मजल्यावरून शेजारच्या इमारतीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तोल गेला आणि तो दोन्ही इमारतींना जोडणाऱ्या केबल वायरमध्ये अडकला. काही काळ गुंत्यात अडकून पडल्यावर त्याचा सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाला.
पण आपली सुटका करून घेण्यास काही त्याला यश आलं नाही. शेवटी अग्निशमन दलाने या माणसाला वाचवलं. काही काळानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र त्याच्या या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.