जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानींना मिळालं 'हे' स्थान

भल्याभल्यांवर केली मात   

Updated: Jul 14, 2020, 07:16 PM IST
जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानींना मिळालं 'हे' स्थान title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जगभरातील श्रीमंत व्यक्तीमध्ये गणल्या जाणाऱ्या अब्जधीश Mukesh Ambani  मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या आकड्यानं आणखी एक ट़प्पा ओलांडला आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा लक्षणीयरित्या वाढला असून, Reliance Industries  रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याहीपेक्षा अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा जास्त आहे. जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या या आदीत पहिल्या दहाजणांमध्ये स्थान मिळवणारे मुकेश अंबानी हे आशिया खंडातील एकमेव व्यक्ती ठरले आहेत. (Bloomberg Billionaire Index) ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या माहितीनुसार अंबानी यांची एकूण संपत्ती ७२.४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. परिणामी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीसह रिलायन्सच्या एम कॅपमध्येही सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत रिलायन्सच्या एम- कॅपनं  १२ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

गेल्या काही काळापासून शेअर मार्केटमध्ये रिलायन्सला चांगला दर मिळत आहे. कंपनीच्या शेअर्सच्या दरांमध्या दुपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, जिओचीही उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळत आहे. रिलायन्सनं जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २५.२४ टक्क्यांच्या भागीदारीची विक्री करत त्या माध्यमातून १.१८ लाख कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे. 

 

(Bloomberg Billionaire Index) च्या यादीत सध्या पहिल्या स्थानावर ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती १८४ अब्ज डॉलर इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यामागोमाग बिल गेट्स यांचं नाव असून, त्यांच्या नावे ११५ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीची नोंद आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर ९४.५ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह बर्नार्ड आरनॉल्ट यांनी स्थान मिळवलं आहे. मार्क झुकरबर्ग यांना या यादीत ९०.८ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह चौथं स्थान मिळालं आहे. या यादीत पाचव्या स्थानी स्टेले बालमर यांचं नाव असून, त्यांच्या संपत्तीचा आकडा ७४.६ अब्ज डॉलर इतका आहे.