तालिबानमध्ये चोरांचे भर मैदानात हात कापत शिक्षा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या कंदहारमधील अहमद शाही मैदानात ही शिक्षा देण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी नऊजणांना फटके देण्यात आले. राज्यपाल कार्यालयातील प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींना ३५ ते ३९ फटके मारण्यात आले.
मैदानात शिक्षा दिली जात असताना तालिबानी अधिकारी, धार्मिक गुरु, स्थानिक नागरिक उपस्थित होते. मैदानात शिक्षा दिली जात असतानाचा फोटो समोर आला असून यामध्ये नऊ लोक खाली जमिनीवर बसलेले दिसत आहेत.
मानवाधिकार वकील आणि अफगाण पुनर्वसन व निर्वासित मंत्री यांचे माजी धोरण सल्लागार शबनम नसिमी यांनी तालिबान अधिकार्यांसह स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून बसलेल्या लोकांचे फोटो शेअर केले आहेत.
The Taliban have reportedly cut off the hands of 4 people in a football stadium in Kandahar today, accused of theft, in front of spectators.
People are being lashed, amputated & executed in Afghanistan, without fair trial and due process.
This is a human rights violation. pic.twitter.com/vLcjCOTOM5
— Shabnam Nasimi (@NasimiShabnam) January 17, 2023
दरम्यान अफगाणिस्तानमधील पत्रकार ताजुदेन सोरोश यांनी ट्विटरवर स्टेडियमच्या बाहेरील दृश्य दाखवणारा फोटो शेअर केला आहे. “ही फक्त इतिहासाची पुनरावृत्ती आहे. 1990 च्या दशकाप्रमाणे तालिबानने सार्वजनिक शिक्षा सुरू केली आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तालिबानने डिसेंबर महिन्यात हत्येच्या आरोपातील दोषीला जाहीर शिक्षा दिली होती. तालिबान पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर जाहीरपणे फाशी देण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत गोळ्या घालत ही शिक्षा देण्यात आली होती. अनेक मोठे अधिकारी यावेळी उपस्थित होते.