स्वितझर्लंड : स्विस बँकेने (Swiss Bank) पुन्हा एकदा भारतीय खातेदारांची यादी जाहीर केली आहे. वार्षिक स्वयंचलित माहिती देवाणघेवाण (annual automatic information exchange) अंतर्गत भारताला स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांची चौथी यादी प्राप्त झाली आहे. यामध्ये ज्या भारतीय नागरिकांची आणि संस्थांची मोठी रक्कम येथे जमा आहे त्यांचा तपशील आहे. करारानुसार, स्वित्झर्लंडने सुमारे 34 लाख आर्थिक खात्यांचा तपशील 101 देशांशी शेअर केला आहे. (swiss bank shares 4th list of account holders many names are to come out)
पीटीआयनुसार, स्विस बँकेने भारतासोबत शेअर केलेल्या तपशिलांच्या चौथ्या संचामध्ये शेकडो आर्थिक खात्यांचा पूर्ण समावेश आहे. यामध्ये विशिष्ट व्यक्ती, कॉर्पोरेट आणि ट्रस्टशी संबंधित खाती समाविष्ट आहेत. अहवालानुसार, या एक्सचेंज अंतर्गत सुमारे 34 लाख खात्यांचे तपशील 101 देशांसोबत शेअर केले गेले आहेत. भारतासोबत शेअर केलेल्या खात्यांच्या संदर्भात या खात्यांमध्ये काळा पैसा जमा आहे, असे सांगण्यात आलं नसलं तरी, स्विस बँकेतील ही खाती ओपन टॅक्स वाचवण्यासाठी उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्विस बँकेकडून मिळालेल्या या बँकिंग डेटाचा वापर मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग तसेच करचुकवेगिरीच्या इतर प्रकरणांचा तपास करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं सूत्रांच्या हवाल्यानं अहवालात म्हटलंय. आता या खात्यांवर आयकर विभाग लक्ष ठेवणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारताला सप्टेंबर 2019 मध्ये AEOI अंतर्गत स्वित्झर्लंडकडून खात्याच्या तपशीलांचा पहिला संच प्राप्त झाला होता. त्यावेळी ही माहिती मिळवणाऱ्या देशांची संख्या 75 होती. मागील वर्षाबद्दल बोलायचे तर भारतासह 86 देशांसोबत तपशील शेअर करण्यात आला.
या स्विस बँक खात्यांच्या तपशीलामुळे चुकीच्या पद्धतीने बेहिशेबी संपत्ती मिळवण्यासाठी या खात्यांचा वापर करणाऱ्या लोकांवर कारवाई करणे सोपे होईल. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (FTA) ने सोमवारी 101 देशांना स्विस बँकांचे तपशील शेअर केले आणि सांगितले की यावेळी डेटा एक्सचेंज प्रोग्राममध्ये 5 नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी अल्बानिया, ब्रुनेई दारुसलाम, नायजेरिया, पेरू आणि तुर्की या देशांनाही त्यांच्या देशातील लोकांनी उघडलेल्या खात्यांचा तपशील देण्यात आला आहे.
खात्यांचा तपशील शेअर करताना, एफटीएने असेही सांगितले की यावेळी स्विस बँकांमध्ये सुमारे 1 लाख नवीन खाती उघडण्यात आली आहेत. एफटीएनुसार, भारतीय खात्यांशी संबंधित तपशील देशातील मोठ्या संस्था, व्यावसायिक घराणे आणि व्यक्तींशी संबंधित आहेत. तपशीलांमध्ये, ओळख, खातेदाराचे नाव, पत्ता, निवास तसेच इतर आर्थिक माहिती दिली आहे. पुढील म्हणजे स्विस बँक खात्यांच्या तपशीलाशी संबंधित पाचवा संच पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात सामायिक केला जाईल.