OIC बैठक : लढाई दहशतवादाविरोधात, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही - सुषमा स्वराज

ओआयसी बैठकीत पहिल्यांदाच भारताला 'प्रमुख अतिथी' म्हणून पाचारण करण्यात आलंय

Updated: Mar 1, 2019, 02:11 PM IST
OIC बैठक : लढाई दहशतवादाविरोधात, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही - सुषमा स्वराज title=

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन'च्या परिषदेसाठी (OIC Summit)  अबुधाबीमध्ये दाखल झाल्या आहेत. 'भारतासाठी २०१९ हे आयओसी संबंधांसाठी महत्त्वपूर्ण वर्ष ठरलंय. हे वर्ष भारत महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरं करत आहे' असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. 'भारताची अर्थव्यवस्था सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनतेय. जागतिक पातळीवर खास करून दक्षिण आशियाई क्षेत्रात दहशतवाद फोफावतोय. यात अनेक जण आपले प्राण गमावत आहेत' असंही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. 

'दहशतवादाविरोधात सुरु असलेली ही लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. इस्लामचा खरा अर्थ शांति आहे. अल्लाहच्या ९९ नावांपैंकी कोणत्याही नावाचा अर्थ 'हिंसा' असा नाही. अशा वेळी सर्वच धर्मांनी शांतिसाठी प्रयत्न करायला हवेत. मी इथं आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि १.३ अरब भारतीय ज्यामध्ये १८.५ रोड मुस्लीम भाऊ-बहिणींचाही समावेश आहे, त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आलेय. आमचे मुस्लीम भाऊ - बहिण भारतातील विविधतेपैंकीच एक आहेत' असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आणि त्यानंतर ताणलेल्या भारत-पाकिस्तान संबंधांनंतर या बैठकीत सहभागी होत आहेत. 

भारताचा पहिल्यांदाच सहभाग

अबू धाबी एअरपोर्टवर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमध्ये ५७ देशांचा सहभाग आहे. सुषमा स्वराज दोन दिवस संमेलनात 'प्रमुख अतिथी' म्हणून सहभागी होणार आहेत. भारताला पहिल्यांदाच 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन'च्या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलंय. दहशतवादावर पाकिस्तानला घेरण्यासाठी आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी या परिषदेचा वापर करू शकतो. याच कारणामुळेच पाकिस्तान या बैठकीत सुषमा स्वराज यांना बोलावण्यास विरोध करत होती. सुषमा स्वराज बैठकीत सहभागी झाल्या तर आम्ही परिषदेत सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. मात्र पाकिस्तानच्या या धमकीचा ओआयसीवर काहीही परिणाम झाला नाही.

सुषमा स्वराज इस्लामिक देशांच्या 'प्रमुख अतिथी', पाकिस्तानचा जळफळाट

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सुरुवाती च्या काही बैठकीत सुषमा स्वराज सहभागी होणार आहेत. 'परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज इस्लामिक सहाकरी संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या ४६ व्या बैठकीसाठी अबूधाबीला रवाना झाल्यात' असं ट्विट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केलं होतं. या कार्यक्रमात पहिल्यांदाच भारताला 'प्रमुख अतिथी' म्हणून पाचारण करण्यात आलंय.

यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संपूर्ण बैठकीला संबोधितही करणार आहेत. यापूर्वी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी बुधवारी सुषमा स्वराज यांच्या या उपस्थितीला जोरदार विरोध दर्शवला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमुळे आपण ओआयसी बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी पाकिस्तानच्या संसदेत म्हटलं होतं. याबद्दल आपण संयुक्त अरब अमिरात (यूएई)च्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आणि सुषमा स्वराज यांना आमंत्रित करण्याबद्दल आपली नाराजीही व्यक्त केली, असंही त्यांनी म्हटलंय.