महागाईनं श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, अन्नधान्य महाग, इंधनाची प्रचंड टंचाई

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अन्नधान्य प्रचंड महाग झालं असून इंधनाची प्रचंड टंचाई आहे.

Updated: Jul 12, 2022, 10:34 PM IST
महागाईनं श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, अन्नधान्य महाग, इंधनाची प्रचंड टंचाई  title=

कोलंबो : बातमी शेजारच्या देशातून. श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अन्नधान्य प्रचंड महाग झालं असून इंधनाची प्रचंड टंचाई आहे. सरकार नसल्यात जमा आहे. चीनच्या नादी लागलं तर कसं वाट्टोळं होतं, याचं श्रीलंका हे मूर्तीमंत उदाहरण बनलाय. (sri lanka economics crisis bad conditons for country due to dearness)

राक्षसी महागाई आणि राजकीय अस्थैर्य या दुष्टचक्रामध्ये श्रीलंका पुरती मेटाकुटीला आलीय. देशात महागाईनं उच्चांक गाठला असताना राष्ट्राध्यक्ष परागंदा झालेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. 

टोमॅटो 150 रुपये किलोंवर जाऊन पोहोचलाय, कांदे 200 रुपये तर बटाटे 220 श्रीलंकन रुपये मोजून घ्यावे लागतायत. एक किलो तांदुळाचा भाव 145 रुपयांवर गेलाय. गाजराचा दर तर किलोमागे तब्बल 490 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. 

खाद्यान्न महाग झाली असतानाच देशात इंधनाचाही प्रचंड तुटवडा जाणवतोय. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रागा पाहायला मिळतायत. उपलब्ध इंधन हे आवश्यक गोष्टींसाठी वापरलं जात असल्यानं सर्वसामान्य वाहनचालक पुरते वैतागलेत आलेत.

व्यावसायिकांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. हॉटेलचालकांना गॅस मिळत नसल्यानं चक्क लाकडाच्या मोळ्या आणून त्यावर स्वयंपाक करावा लागतोय.

एकीकडे जनता हैराण असताना सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वातच नसल्याचं चित्र आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे सध्या कुठे आहेत, हे कुणालाच माहिती नाही. त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचा ताबा सामान्य नागरिकांनी घेतलाय... कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला बसलेला फटका, त्यानंतर युद्धामुळे भडकलेले इंधनाचे दर आणि चीनकडून घेतलेलं भरमसाठ कर्ज या कात्रीत श्रीलंका पुरता अडकलाय.

भारतानं यंदाच्या वर्षातच 3 पूर्णांक 8 अब्ज डॉलर्सची मदत श्रीलंकेला केली असली तरी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे ती पुरेशी पडत नाहीये. चीनच्या कर्ज धोरण ट्रॅपमध्ये अडकलं तर एखादा देश कसा रसातळाला जाऊ शकतो याचं श्रीलंका हे ताजं उदाहरण आहे.