कोलंबो : Sri Lanka Economics Crisis : देशात आर्थिक संकट उभे राहिले. लोक महागाईने होरपळून निघाले. त्यातच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. आता कोलंबोतील संसद भवनाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी टँक तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांनाही हटवण्यात आले आहेत. आता तर कोलंबोमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक राष्ट्रपती भवनात घुसले होते. संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्लाबोल केल्याने आंदोलक आणि लष्कराचे जवान आमने-सामने आले होते. आंदोलकांनी राष्ट्रपती निवासात धुगगूस घातल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहे. दरम्यान, आंदोलक पंतप्रधान यांच्या आसनावर कब्जा करु नये, यासाठी सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
देश आर्थिक संकटाच्या खाईत गेला. त्यानंतरन श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केले आहे. त्यांनी मालदीवची राजधानी माले येथे आश्रय घेतला आहे. आज गोटाबाया हे सिंगापूरला जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तेथूनच ते आपल्या पदाच्या राजीनाम्याचा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालदीवमध्ये त्यांना नेण्यासाठी एका खासगी जेट विमान दाखल झाले आहे. यासाठी त्यांना मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, राष्ट्रपती गोटाबाया यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिलेला नाही, असे श्रीलंका संसदेच्या सभापती कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते आज राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.