'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

दक्षिण कोरियामधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला आलेल्या मुलांसाठी 62.12 लाख रुपये देऊ केले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2024, 01:52 PM IST
'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा title=

जगभरातील प्रत्येक देशासमोर वेगवेगळी आव्हानं आहेत. कोणी आर्थिक समस्यांचा सामना करत आहे, तर काहींसमोर पायाभूत सुविधांचं आव्हान आहे. पाकिस्तानसारख्या देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. पण जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्यासमोर जन्मदर ही मोठी समस्या उभी आहे. या देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया अशा देशांचा समावेश आहे. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी या देशात नवनव्या योजना आणल्या जात आहेत. 

2021 नंतर जन्म झाल्यास 62.12 लाख रुपये

दक्षिण कोरियामधील बांधकाम कंपनी Booyoung Group ने जन्मदर वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना जबरदस्त ऑफर दिली आहे. कंपनी 2021 नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला 100 मिलियन वोन म्हणजेच 62.12 लाख रुपये देऊ करत आहे. कंपनीच्या सीईओंनी देशातील जन्मदर वाढवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे अशी माहिती दिली आहे.

यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचा वैद्यकीय खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च समाविष्ट आहे. Booyoung Group चे चेअरमन ली जोंग क्यून यांनी सांगितलं की, 2021 नंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलालसाठी कर्मचाऱ्याला 62.12 लाख रुपये दिले जाणार आहेत.

फक्त 70 कर्मचारी पात्र

दक्षिण कोरिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेसाठी 70 कर्मचारी पात्र ठरले आहेत. यासाठी कंपनीला एकूण 7 बिलियन वॉन खर्च येणार आहे. 84 वर्षीय ली यांनी कंपनी भविष्यात हे धोरण कायम ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. द क्यूंग्यांग शिनमुनच्या एका अहवालानुसार, ते पुढे म्हणाले “जर सरकारने जमीन उपलब्ध करून दिली, तर आम्ही तीन मुलांना जन्म देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना तीन मुलांसाठी बाळंतपण प्रोत्साहन किंवा कायमस्वरूपी भाड्याचे घर यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय देऊ". 

ली यांनी यावेळी इशारा दिला आहे की, "जर जन्मदरात अशाच प्रकारे घट होत राहिली तर 20 वर्षात राष्ट्रीय अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल. मुलांचा सांभाळ करताना खांद्यावर येणारं आर्थिक ओझं तसंच काम आणि कुटुंब यांच्यात ताळमेळ करताना होणारा गोंधळ ही जन्मदर घटण्याची प्रमुख कारणं आहेत. जन्मदर कमी असल्याने आम्ही अपारंपारिक पद्धतीने प्रोत्साहन देत आहोत".

जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देणारी एक कर्मचारी कंपनीच्या या धोरणामुळे प्रचंड आनंदी आहे. आपल्याला मुलाचं पालनपोषण करताना येणाऱ्या खर्चाची चिंता होती. पण कंपनीने माझी चिंता मिटवली असून त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आता मी दुसऱ्या बाळाचा विचार करु शकते अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान दक्षिण कोरियात 2022 मध्ये फक्त 2 लाख 50 हजार बाळांचा जन्म झाला आहे. या योजनेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भाड्याचं घर दिलं जात आहे. याशिवाय त्यांच्यासाठी करमुक्त धोरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.