वॉशिंग्टन : अमेरिकेवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. या आर्थिक संकटमुळे 80 हजार कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीची वेळ जवळ आलेली आहे, अशावेळी त्यांना अशा संकटाचा देखील सामना करावा लागणार आहे. अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग या शटडाऊनमुळे बंद पडण्याची शक्यता वाढत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना विदाऊट पे सक्तीच्या रजेवर पाठवलं जाणार आहे.
निधीतील तूट भरुन काढण्यासाठी सरकारतर्फे 'स्टॉप गॅप बिल' आणले जाते. अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यास सरकारी यंत्रणांना त्यांचं कामकाज थांबवावं लागतं. हे डील अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाने आणि सिनेट सदस्यांनी मंजूर करावं लागतं.
यापूर्वी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना 2013 मध्येही दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे 8 लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं. सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे बारा वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली असल्याचं सांगण्यात येत आहे.