जर पुतीन यांना परदेशात अटक करण्याचा प्रयत्न केला तर...; रशियाची संपूर्ण जगाला जाहीर धमकी

Putin Arrest Update: आंतरराष्ट्रीय फौजदारी कोर्टाने (International Criminal Court) रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांच्याविरोधात वॉरंट (Warrant) जारी केलं आहे. दरम्यान, यावरुन रशियाने नाराजी जाहीर केली आहे. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी जर पुतीन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तर ही युद्धाची घोषणा (declaration of war) असं समजलं जाईल अशा शब्दांत धमकावलं आहे.   

Updated: Mar 24, 2023, 07:37 AM IST
जर पुतीन यांना परदेशात अटक करण्याचा प्रयत्न केला तर...; रशियाची संपूर्ण जगाला जाहीर धमकी title=

Warrant Againt Putin: आंतरराष्ट्रीय फौजदारी कोर्टाने (International Criminal Court) रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन (Vladimir Putin) यांच्याविरोधात वॉरंट (Warrant) जारी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण तापलं आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या या निकालावर रशियाने नाराजी जाहीर करत निषेध नोंदवला आहे. दरम्यान दुसरीकडे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी तर जगाला जाहीर धमकीच दिली आहे. जर पुतीन यांना परदेशात अटक करण्याचा प्रयत्न झाला तर याकडे युद्धाची घोषणा म्हणून पाहिलं जाईल असं म्हटलं आहे. 

Dmitry Medvedev हे 2008 आणि 2012 दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. पुतीन यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यापासून ते वारंवार आक्रमक विधानं करत आहे. त्यांनी तर आण्विक हल्ल्लाची धमकीही दिली होती. बुधवारी त्यांनी जर पुतीन यांना अटक झाली तर रशिया त्या देशाविरोधात शस्त्र उचलेल असा इशारा दिला आहे. 

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर तेथील अनेक नागरिकांवर निर्वासित होण्याची वेळ आली होती. पुतीन यांनी युद्ध पुकारल्यामुळेच लहान मुलांसह अनेक नागरिकांना निर्वासित व्हावं लागतं. नेमकं याच आरोपाखाली पुतीन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. 

कोर्टाने पुतीन यांच्यासह रशियातील बालहक्क आयुक्त मारिया लोवोवा-बेलोवा यांच्या विरोधातही वॉरंट जारी केलं आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्त भागातून लहान मुलांना रशियात हलवण्यात मारिया लोवोवा-बेलोवा यांचाही सहभाग होता असा आरोप आहे. 

"पुतीन यांना अटक होण्याची स्थिती कधीच निर्माण होणार नाही हे स्पष्ट आहे. पण तशी स्थिती निर्माण होईल असा विचार करा. अण्वस्त्र राष्ट्राचा सध्याचा प्रमुख जर्मनीच्या हद्दीत येतो आणि त्याला अटक केली जाते. हे काय आहे? रशियन फेडरेशनविरुद्ध युद्धाची घोषणा," असं Dmitry Medvedev म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी जर असं काही झालं तर आम्ही रॉकेटसह सर्व गोष्टींचा वापर करु अशी धमकीच दिली आहे. 

Dmitry Medvedev हे सध्या रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयामुळे पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध आणखी बिघडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

दरम्यान पुतीन यांच्याविरोधात वॉरंट जारी केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या धमक्यांवर आंततराष्ट्रीय कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत प्रतिबंधित कृत्यांसाठी जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना अडथळा आणण्याच्या प्रयत्नांबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत असं कोर्टाने म्हटलं आहे.