Ukraine Drone Attack: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचे नाव घेत नाहीए. दरम्यान, युक्रेनच्या एका ड्रोनने रशियात घुसून हल्ला केल्याचे वृत्त आहे. हे ड्रोन रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आणि तेथील दोन इमारतींवर हल्ला केला. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. युक्रेनियन ड्रोनने रात्री मॉस्कोवर हल्ला केला आणि दोन सरकारी इमारतींचे नुकसान केले. या सरकारी इमारतींच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. कुणीही जीव गमावला नाही,अशी माहिती . मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिली.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर मॉस्कोमध्ये हवाई वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. मॉस्कोमध्ये युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियन लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देत अनेक ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत शांतता प्रस्तावाबाबत विधान आले होते. रशियाने युक्रेनशी चर्चा करण्याची शक्यता नाकारली नसल्याचे पुतीन म्हणाले होते. रशिया-युक्रेन युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भूमिका थोडी नरम झाल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनवरील कारवाई अधिक तीव्र केली जाणार नसल्याचे पुतीन यांनी सांगितले.
दरम्यान, रशियाने नाटोला मोठी धमकी दिल्याचेही वृत्त आहे. अन्नधान्याचा पुरवठा बंद करण्याची ही धमकी आहे. धान्य पुरवठा रशिया वॅगनर ग्रुपला पाठवू शकतो. रशियाने रोमानियामध्ये ड्रोन हल्ला केला ज्यामध्ये धान्य गोदामांना लक्ष्य करण्यात आले.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्यावर्षी फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंचे मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. रशियन हल्ल्यात पूर्व युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही युक्रेन झुकले नाही आणि सातत्याने रशियाला प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे.