russia ukraine war: रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या 25 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये रशियाने युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही तोडगा निघालेला नाही. आता रशियाने हल्ल्याची तीव्रता वाढवली असून युक्रेनवर थर्मोबेरिक बॉम्ब (Thermobaric Bomb) फेकले आहेत. या हल्ल्यांचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.
ज्यामध्ये रशियन सैन्याने युक्रेनवर घातक थर्मोबेरिक मल्टिपल लॉन्च रॉकेट डागल्याचा दावा केला जात आहे. थर्मोबॅरिक बॉम्ब लक्षाला 'वितळण्यासाठी' ओळखले जातात
'फादर ऑफ ऑल बॉम्ब'ने युक्रेनमध्ये विध्वंस
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच या बॉम्बची चर्चा झाली सुरु होती. थर्मोबेरिक बॉम्बला 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' असंही म्हटलं जातं. अण्वस्त्रांप्रमाणेच हा बॉम्बही प्राणघातक आणि अत्यंत विनाशकारी आहे.
थर्मोबेरिक बॉम्ब म्हणजे काय?
थर्मोबेरिक बॉम्बची गणना जगातील सर्वात घातक स्फोटकांमध्ये केली जाते. हे बॉम्ब रशियाने 2007 मध्ये तयार केले होते. त्याचं वजन सुमारे 7100 किलो आहे. याच्या मार्गात येणारी माणसं आणि इमारतींचा विनाश अटळ आहे. याला एरोसोल किंवा व्हॅक्यूम बॉम्ब देखील म्हणतात. 44 टन टीएनटीच्या सामर्थ्याने त्याचा स्फोट होऊ शकतो. व्हॅक्यूम बॉम्ब ऑक्सिजन शोषून मोठा स्फोट करतो. त्यातून अल्ट्रासोनिक शॉकवेव्ह बाहेर पडतात, ज्यामुळे भयंकर विनाश होतो.
सोशल मीडियावर संतापाची लाट
या क्लिपमुळे सोशल मीडियावर भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर अनेकांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जगातील सर्वात वाईट व्यक्ती म्हटलं आहे. भयानक फुटेजमध्ये मोठे रॉकेट लाँचर एकापाठोपाठ 11 वेळा हल्ले करताना दिसत आहे. @JimmySecUK ने ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'युक्रेनवर रशियन TOS-1a थर्मोबॅरिक एमएलआरएसने प्रथमच हल्ला केला आहे.'
धोकादायक शस्त्रांमध्ये अव्वल
रशियाकडे थर्मोबॅरिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे. ज्यामध्ये TOS-1 'बुराटिनो' आणि TOS-1A 'सोलंटसेपेक' यांचा समावेश आहे. हे सर्व बॉम्ब सध्या युद्धभूमीवर उपलब्ध असलेली सर्वात धोकादायक शस्त्रं म्हणून ओळखले जातात.