USA Dr. Sudipta Mohanty : अमेरिकेत विमानामध्ये हस्तमैथून करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या भारतीय वंशाचे डॉक्टरबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत विमानामध्ये मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा भारतीय वंशाच्या डॉक्टरवरचा आरोप खोटा ठरला आहे. या प्रकरणात, भारतीय वंशाचे डॉक्टर विमानात एका किशोरवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी आढळले नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
33 वर्षीय डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांची बोस्टन न्यायालयात तीन दिवस चाललेल्या सुनावणीनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मे 2022 हा सगळा प्रकार घडला होता. भारतीय वंशाचे डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांच्यावर शेजारी बसलेल्या मुलीने गंभीर आरोप केला होता. आरोपी डॉक्टरांनी मला पाहत असताना ब्लँकेटने झाकून हस्तमैथुन केले होते. अचानक ब्लँकेट काढले असता त्यांच्या पँटची चेन उघडी असल्याचे दिसले, असा दावा मुलीने केला होता. यानंतर डॉक्टर मोहंती यांच्यावर बरीच टीका झाली होती.
सुदिप्ता मोहंती होनोलुलूहून बोस्टनला विमानाने जात होते. त्याच्या शेजारी एक 14 वर्षांची मुलगी बसली होती. मुलगी आजी-आजोबांसोबत प्रवास करत होती. त्यावेळी मुलीने फिर्याद दिली की प्रवासादरम्यान डॉक्टर मोहंती यांनी स्वत: ला मानेपर्यंत ब्लँकेटने झाकले होते. आरोपी डॉक्टर ब्लँकेटच्या आत हस्तमैथुन करत असल्याचा आरोप मुलीने केला. यानंतर मुलगी उठली आणि दुसऱ्या रांगेतील रिकाम्या जागेवर जाऊन बसली. बोस्टनला पोहोचल्यानंतर मुलीने संपूर्ण घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. हे ऐकून कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
सुदिप्ता मोहंती हे अमेरिकेच्या बोस्टनमध्ये अंतर्गत औषध आणि प्राथमिक डॉक्टर आहेत. तक्रार दाखल होताच अमेरिकी तपास यंत्रणा एफबीआयने 11 ऑगस्ट 2023 रोजी डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांना अटक केली. कोर्टानं काही शर्थींवर मोहंती यांची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आणि सुदिप्ता यांच्यावर जे काही आरोप झाले, ते कुठेही सिद्ध होत नसल्याने त्यांची आरोपांतून निर्दोष सुटका करत आहोत, असे म्हटलं.
डॉक्टर सुदिप्ता मोहंतींचे स्पष्टीकरण
"मी माझ्या होणाऱ्या पत्नीसोबत विमानामध्ये होतो. माझ्यावर असे आरोप कशाच्या आधारे लावले गेले हे आम्हा दोघांनाही समजू शकले नाही. मी एक डॉक्टर आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. अशा परिस्थितीत असे खोटे आरोप केल्यावर मन दुखावले जाते," असे स्पष्टीकरण डॉक्टर सुदिप्ता मोहंती यांनी दिले होते.