नवी दिल्ली : चीनी सैन्याच्या वेस्टर्न थिएटरचे कमांडर लेफ्टनंट जनरल झाओ झोंगकीच्या बदलीची तयारी पूर्ण झालीय. त्याच्या जागी लेफ्टनंट जनरल ल्यू जैनली घेणार आहे. गलवानमध्ये भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याची योजना झाओ झोंगकीने बनवली होती. चीनी सैन्यातील सर्वात ताकदवान जनरल झाओ झोंगकी आपल्या सैन्यासोबत लडाख ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. या ठिकाणी त्यांनी २० वर्षाहून अधिक काळ काम केलंय.
चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करुन जनरल झालो झोंगकी सेंट्रल मिलिट्री कमीशनमध्ये वाईस चेअरमन बनू इच्छित आहे. डोकलाममध्ये चीनी सैन्य मागे हटल्याचा राग तो लडाखमध्ये काढतोय. २०१७ मध्ये झालेल्या डोकलाम वादावेळी वेस्टर्न थिएटर कमानचा तो कमांडर होता.
झाओ झोंगकीला व्हिएतनाम युद्धाचा अनुभव आहे. युद्धात त्याच्या यशस्वी प्लानिंगमुळे त्याला मोठ्या जबाबदारी मिळू लागल्या.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. आज आपण काही पावले उचलली नाही तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल. आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली नियमाधारित व्यवस्था मोडीत काढेल. त्यामुळे आज आपण त्यांच्यासमोर झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनकडे दयेची भीक मागण्याची वेळ येईल, असे माईक पॉम्पेओ यांनी म्हटले.
चीन ही मुक्त जगासमोरील सध्याची प्रमुख समस्या आहे. आम्ही एकट्याने या आव्हानाचा सामना करु शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो, जी७, जी २० या सगळ्यांच्या रुपाने असलेली आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी ताकद यासाठी गरजेची असेल. मात्र, या सगळ्यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असणे गरजेचे आहे. कदाचित आता आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आल्याचेही माईक पॉम्पेओ यांनी सांगितले.