मुंबई : जगात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक देशांमध्ये वाद सुरु आहे. 2 देशांमधील संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत. त्यामुळे मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी जगासमोर एक आवाहन केलं आहे. ज्यासाठी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देखील सूचवलं आहे. (global peace commission)
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदी, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख (UN Secretary-General) आणि पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची निवड करायची असं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना वाटतंय. जगात जागतिक शांतता राखण्यासाठी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र संघासमोर प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. या प्रस्तावात असा आयोग बनवला जाईल जो दोन देशांमधील युद्ध रोखण्यासाठी काम करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Indian PM Narendra Modi) यांनाही या आयोगाचे सदस्य बनवण्याची चर्चा आहे.
या काळात जगातील अनेक देश एकतर युद्धात अडकले आहेत किंवा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तणाव इतका वाढला आहे की शांतता राखणे हे आव्हान ठरत आहे. आता ही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Mexican President Andres Manuel Lopez Obrador) यांनी संयुक्त राष्ट्र संघाकडे प्रस्ताव मांडला आहे.
सध्या व्हायरल झालेल्या एका पत्रात आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी आवाहन केले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करावी.पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिया गुटेरेस (Antonio Guterres) यांना या समितीत सदस्य बनवण्यात यावे.
या तिघांच्या नेतृत्वाखाली जी समिती स्थापन केली जाईल ती जागतिक शांततेसाठी काम करेल. युद्ध झाल्यास संवादाच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी पाच वर्षे कोणत्याही दोन देशांत युद्ध होऊ नये आणि शांतता कायम राहावी, हा या समितीचा उद्देश असेल.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला प्रस्ताव यूएनकडे नेणार असल्याची माहिती दिली आहे. जगातील प्रत्येक देश त्यांचा प्रस्ताव स्वीकारेल अशी त्यांना मनापासून आशा आहे.
अमेरिका, रशिया आणि चीनसारखे मोठे देशही या प्रस्तावाचे स्वागत करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, जागतिक शांततेसाठी हे सदस्य जे काही सूचना देतील, जग त्यांचे पालन करेल आणि त्यानंतर एक चांगला समाज निर्माण करण्यावर भर दिला जाईल. मात्र या प्रस्तावावर आतापर्यंत इतर कोणत्याही देशाकडून प्रतिसाद आलेला नाही.
यूएननेही अशा कोणत्याही प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. पण मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ज्या उद्देशाने हा प्रस्ताव आणत आहेत ते जगासाठी खूप महत्त्वाचे आहे.
सध्या जगातील अनेक देश युद्धामुळे आर्थिक संकटातून जात आहेत, महागाई शिगेला पोहोचली आहे, गरिबी वाढत आहे. अशा परिस्थितीत या परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा आयोगाची गरज आहे, जो वेळीच हस्तक्षेप करू शकेल, जो मार्ग दाखवू शकेल. या कामासाठी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच्यासोबत यूएन प्रमुख आणि पोप फ्रान्सिस यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.