सर्वोच्च युद्धभूमीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज जगातली सर्वोच्च युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधल्या लष्कराच्या बेस कॅम्पला भेट दिली. कठीण परिस्थितीत देशाच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांशी संवाद साधत सैनिकांप्रती देशाला आदर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बेस कँपवर असलेल्या शहिदांच्या स्मृतीस्थळी राष्ट्रपतींनी पुष्पचक्र अर्पण केलं. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावतदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी दिल्लीला आल्यानंतर राष्ट्रपतीभवनात येऊन पाहुणचार स्वीकारण्याचं आमंत्रणही कोविंद यांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिलं. दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर सियाचिनचा दौरा करणारे कोविंद हे दुसरे राष्ट्रपती आहेत. कलाम यांनी २००४ साली सियाचिनला भेट दिली होती.