ब्रिटनमध्येही महाराष्ट्राप्रमाणे 'बंड', अल्प मतात आल्याने जॉन्सन सोडणार पंतप्रधानपदाची खुर्ची

Boris Johnson Will Resign: युनायटेड किंगडममध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे राजकीय संकटाचा सामना करावा लागला आहे. मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.  

Updated: Jul 7, 2022, 03:24 PM IST
ब्रिटनमध्येही महाराष्ट्राप्रमाणे 'बंड', अल्प मतात आल्याने जॉन्सन सोडणार पंतप्रधानपदाची खुर्ची title=

लंडन : Boris Johnson Will Resign: युनायटेड किंगडममध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणे राजकीय संकटाचा सामना करावा लागला आहे. मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती ब्रिटीश प्रसारमाध्यमांकडून देण्यात येत आहे. 40 पेक्षा जास्त मंत्र्यांनी बंडखोरी केल्याने सरकार अल्पमतात आले आहे.

मंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आवाहन 

ब्रिटनचे नवे अर्थमंत्री नादीम जहावी यांनी गुरुवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले.  पंतप्रधान, तुम्हाला माहीत आहे की, काय करणे योग्य आहे आणि आता तुम्ही राजीनामा द्या, असे त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रिटनवर राजकीय संकट असताना दोन दिवसांपूर्वी च्या शिक्षणमंत्री मिशेल डोनेलन यांची सरकारकडून पदोन्नती करण्यात आली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांना कठिण परिस्थितीत ठेवले होते, असे सांगून त्यांनी गुरुवारी आपले पद सोडले. त्या म्हणाल्या की, हे समोर आल्याचे मला खूप दुःख झाले आहे, परंतु प्रामाणिकपणाला सर्वात जास्त महत्त्व देणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

जॉन्सन यांच्यावर मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीमान्यासाठी मंत्र्यांचा दबाव दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासात  बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत 40 पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार अल्प मतात आले असून ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पंतप्रधानांची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांनी बंडखोरी करत राजीनामा दिला आहे. तसेच जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचाही आरोप या मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थकाचा राजीनामा

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वात आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळजवळ 40 पेक्षा जास्त मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरिस यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.