मुंबई : वाराणासी मध्यवर्ती कारागृहातून एका पाकिस्तानी कैद्याची जवळपास १६ वर्षांनंतर सुटका करण्यात आली. इतक्या वर्षांनंतर मायदेशी परतण्याचा आनंद या कैद्याच्या चेहऱ्यावर होताच पण, त्याने भारतातूनही एक अशी आठवण आपल्यासोबत नेली आहे, जी आयुष्यभरासाठी त्याच्यासोबतच राहणार आहे.
जलालुद्दीन असं नाव असणाऱ्या या कैद्याने श्रीमदभगवद्गीता आपल्यासोबत नेली आहे. 'एएनाय' या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली.
हेरगिरीच्या आरोपामुळे जलालुद्दीन नावाच्या या इसमाला वाराणासी येथील कँटॉनमेंट क्षेत्रामध्ये वायुदलाच्या कार्यालयापाशी काही संशयास्पद कागदपत्रांसह अटक करण्यात आली होती.
वाराणासीच्या मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ अधिक्षक अमरिश गौड यांनी याविषयीची माहिती दिली.
जल्लालुद्दीनक़डून त्यावेळी कँटॉनमेंट क्षेत्र आणि इतर ठिकाणचे नकाशे जप्त करण्यात आले होते. ज्यानंतर त्याला ताब्यात घेत १६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार 'ऑफिशिअल सिक्रेट्स अॅक्ट आणि फॉरिनर्स अॅक्ट' अंतर्गत त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यानंतर स्थानिक पोलिसांकडे त्याला सोपवण्यात आलं. आता मायदेशी परतत असताना त्याने आपल्यासोबत श्रीमदभगवद्गीतेची एक प्रत नेली आहे.
जलालुद्दीनला अटक करण्यात आली तेव्हा त्याचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं होतं. ज्यानंतर त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नू (IGNOU) येथून त्याने कला क्षेत्रातील पदवीपर्यंतचं (एमए) शिक्षण घेतलं. कारागृहात त्याने इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण करत इथे आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट लीगमध्ये पंचांचं कामही केलं, अशी माहितीसुद्धा गौड यांनी दिली.
A Pakistani national, Jalaluddin, who was released from Varanasi Central Jail after 16 years, took home Bhagavad Gita with him
Read @ANI Story | https://t.co/oiwp2qlXyU pic.twitter.com/ILG6eILUs3
— ANI Digital (@ani_digital) November 4, 2018
दरम्यान, एका खास पथकासह जलालुद्दीनला अमृतसर येथील वाघा-अटारी भारत-पाकिस्तान सीमेजवळ नेण्यात आलं असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याला सोपवण्यात येणार आहे. ज्यानंतर तो अधिकृतपणे पुन्हा आपल्या देशात जाऊ शकणार आहे.