कराची : रात्री उशिरा पाकिस्तानमधील अनेक मोठ्या शहरांमध्ये अचानक ब्लॅकआउट झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्यामुळे कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, मुलतान आणि रावळपिंडीसह अनेक महत्त्वाची शहरे शनिवारी अंधारात पूर्णपणे बुडाली.
इस्लामाबादचे उपायुक्त हमजा शफाकत यांनी ट्वीट केले की, नॅशनल ट्रान्समिशन कंपनीच्या लाईन खराब झाल्या असून त्यामुळे ब्लॅकआउट झाला. ते म्हणाले की सर्व काही सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याचबरोबर वीजमंत्री ओमर अयूब खान म्हणाले की, पुरवठा खंडित होण्याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले.
Pakistan is hit by a massive power blackout, officials say, with much of the country, including all major cities, plunged into darkness https://t.co/55594UXW7y pic.twitter.com/dDOQt5LJer
— AFP News Agency (@AFP) January 10, 2021
या ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले. मंत्रालयाने सांगितले की, सिंध प्रांतातील गुड्डू पॉवर प्लांटमध्ये रात्री 11.41 वाजता बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मंत्रालयाच्या मते, वीज ट्रान्समिशन सिस्टमची वारंवारिता 50 ते 0 पर्यंत कमी झाल्याने देशभरात ब्लॅकआउट झाले आहे.
पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाल्याची बातमी पसरताच ब्लॉकआऊट ट्विटरवर ट्रेंड करु लागला. यावेळी लोकांनी पाकिस्तानची खिल्ली उडविली. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये ब्लॅकआउट झाला होता. जानेवारी 2015 मध्ये पाकिस्तानात ब्लॅकआऊट झाला आणि बर्याच शहरांमध्ये अनेक तास वीज गायब झाली होती.