Pakistan Energy Crisis : महागाई आणि आर्थिक संकट (financial crisis) पाकिस्तानची (Pakistan) पाठ सोडत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानाच्या संकटांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महागाईमुळे पाकिस्तानातील लोकांना अन्नधान्य मिळणेही कठीण झालं आहे. एक समोर उभं असताना पाकिस्तानच्या दारात नवं संकट आलं आहे. पाकिस्तानमध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा (electricity supply) खंडित करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची आणि पेशावर भागातील 22 जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा ठप्प (power grid failure) झाला आहे. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाला याबाबत निवेदन जारी करावे लागले आहे.
वीजपुरवठा करणाऱ्या नॅशनल ग्रीडमधील एका मोठ्या समस्येमुळे पाकिस्ताना मोठ्या प्रमाणात वीज कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात विजेचे संकट गडद झाले आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7:34 वाजता नॅशनल ग्रीडमध्ये हेवी फ्रिक्वेंसी लीकेजची समस्या निर्माण झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ही संपूर्ण यंत्रणा पुन्हा रुळावर आणण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.
वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच वीज पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे असे सरकारने म्हटले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल ग्रीडमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही वीजपुरवठा खंडित झाली आहे. सोमवारी सकाळी 7.34 वाजता नॅशनल ग्रीड सिस्टीममध्ये हा मोठा बिघाड झाला. पाकिस्तानच्या मंत्रालयाने ही माहिती देण्याआधीच अनेक कंपन्यांनी सोशल मीडियावर लोकांना वीज जाणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली होती.
There are reports of multiple outages from different parts of the city. We are investigating the issue and will keep this space posted.
— Imran Rana, Spokesperson, K-Electric (@imranrana21) January 23, 2023
पाकिस्तानात वीज पुरवठा करणाऱ्या क्वेटा इलेक्ट्रिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, गुड्डूहून क्वेट्टाला जाणाऱ्या दोन ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्या आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे क्वेटासह बलुचिस्तानमधील 22 जिल्हे अंधारात बुडाले आहेत. लाहोर आणि कराचीतील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.