Pakistan Peshawar Mosque Blast: पाकिस्तानमधील (Pakistan) प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पेशावरमधील एका मशिदीमध्ये भीषण स्फोट (Peshawar Mosque Blast) झाला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की मशिदीचा एक भाग पडला असून त्याखाली अनेकजण गाडले गेल्याने दगावल्याचं वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. खैबर-पख्तुन्वा प्रांताच्या राजधानीचं शहर असलेल्या पेशावरमधील पोलीस लाइन परिसरातील मशिदीमध्ये दुपारचं नमाझ पठण सुरु असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या बॉम्बस्फोटामध्ये 100 हून अधिक जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच मदतकार्य करणाऱ्या टीम आणि सुरक्षा यंत्रणांच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 'डॉन' या पाकिस्तानीमधील वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी हा स्फोट झाला.
पेशावरमधील लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असमी यांनी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बॉम्बस्फोट झालेल्या परिसरामध्ये पूर्णपणे प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ रुग्णवाहिकांना या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे. सिकंदार खान या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मशिदीचा एक भाग पडल्याने त्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता आहे.
या हल्ल्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात असून यामधून हल्ल्याची दाहकता दिसून येत आहे. जखमींना पेशावरमधील स्थानिक रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
50 people including police personnel got injured in a blast that occurred in the Police Line Mosque.
#Peshawar pic.twitter.com/3xyRx9KGdH
— Samar Abbas (@Samarjournalist) January 30, 2023
जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शोक व्यक्त केला आहे.