शापित बेट | केवळ तीन चिमुकल्यांचं बेट नष्ट होण्याच्या मार्गावर, काय आहे ते कारण वाचा

 दक्षिण कोरियामधलं हे अत्यंत निसर्गरम्य असं नोक्डो बेट होय. मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय असलेलं हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Updated: Apr 1, 2021, 03:42 PM IST
शापित बेट | केवळ तीन चिमुकल्यांचं बेट नष्ट होण्याच्या मार्गावर, काय आहे ते कारण वाचा title=

दक्षिण कोरियामधलं हे अत्यंत निसर्गरम्य असं नोक्डो बेट होय. मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय असलेलं हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी मुला-माणसांनी भरलेल्या नोक्डोवर आता केवळ १०० जण राहिलेत. यात बहुतांश वृद्ध आहेत आणि केवळ तीन लहान भावंडं बागडताना दिसतात.  १० वर्षांचा लिऊ चॅन ही, ७ वर्षांची लिऊ ची ही आणि ३ वर्षांची लिऊ ये आहेत... त्यांच्याशी खेळायला गावात कुणीच नाही. ना मित्र-मैत्रिणी ना शाळेचे सहकारी... कारण गावातल्या शाळेतही हे तिघेच आहेत.

अनेक वर्ष शाळा बंदच होती. तब्बल ११ वर्षांनी या तिघांसाठी का होईना शाळा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ती किती दिवस चालेल, शंकाच आहे. कारण हे तिघे मोठे झाले, की शाळेत जायला कोण आहे ? आणि या तिघांच्या पुढल्या शिक्षणाचं तरी काय?

दक्षिण कोरियामध्ये १९७० साली जन्मदर ४.५ टक्के होता. गेल्यावर्षी तो केवळ शून्य पूर्णांक ८ टक्के इतका कमी नोंदवला गेला आहे. 
  
त्यामुळे गावात बहुतांश वृद्धच दिसतात. अनेकांची पूर्वीच नसबंदी झालीये. त्यामुळे कुणाला मुल-बाळ होण्याची शक्यता नाहीच. त्यात वयोमानाप्रमाणे एकेक जण देवाघरी जात आहे. असंच सुरू राहिलं, तर एक क्षण असा येईल की नोक्डो पूर्णतः निर्मनुष्य झालेलं असेल.
 
दक्षिण कोरिया हा जगातला सर्वात वेगानं वृद्ध होणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथं जन्मदरही कमी आहे. अनेक बेटं आणि गावांची कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. 
 
जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये निर्माण झालेल्या तफावतीमुळे परिस्थिती अधिकच खराब होते आहे. नष्ट होणारं नोक्डो बेट हे मानववंशशास्त्रासमोरचं मोठं आव्हान आहे.