नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक

१३ महिन्यांपासून भारतातून झाला होता फरार

Updated: Mar 20, 2019, 03:26 PM IST
नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक title=

लंडन : भारतातून पळून गेलेला नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरत होता. पण बुधवारी त्याला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास १३ महिन्यांपासून पीएनबी बँकेचे १३ हजार कोटी बुडवून फरार झालेल्या नीरव मोदीला अखेर आज लंडनमध्ये अटक झाली. सोमवारी ब्रिटेनच्या वेस्टमिंस्टर कोर्टाने नीरव मोदी विरुद्ध अटक वॉरंट काढला होता. २५ मार्चपर्यंत नीरव मोदीला कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

बँकांचे १३ हजार कोटी रुपये बुडवून फरार झालेला नीरव मोदी काही दिवसांपूर्वी रुप बदलून लंडनच्या रस्त्य़ांवर फिरताना दिसला होता. त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस देखील जारी करण्यात आली होती. यानंतर ब्रिटेनच्या वेस्टमिंस्टर कोर्टाने या प्रकरणात गंभीरपणे पाऊलं उचलण्याची आदेश दिले. या अटकेनंतर त्याच्याकडे जामिनाचा पर्याय आहे. कोर्ट नीरव मोदीला काही अटींवर जामीन देऊ शकते.

भारतात आणण्यासाठी प्रयत्न

नीरव मोदीला अटक केल्यानंतर आता भारत सरकार त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता सीबीआई आणि ईडीची एक टीम लंडनला रवाना होणार आहे. या प्रकरणात CBI आणि ED ची टीम UK अॅथॉरिटी आणि लंडनमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याआधी म्हटलं होतं की, या प्रकरणात कारवाई सुरु आहे. लंडनमध्ये नीरव मोदी दिसला आहे. याचा अर्थ असा नसतो की त्याला लगेचच भारतात आणलं जाऊ शकतं. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्य़ात नीरव मोदीला भारताच्य़ा ताब्यात देण्यासाठी विनंती करण्यात आली होती.