अस्ताना: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत कोणालाही अनिवासी भारतीयांशी प्रभावीपणे संवाद साधता आला नव्हता. मात्र, मोदी सरकारने हे करुन दाखवले, असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. त्या गुरुवारी कझाकिस्तानमधील भारतीय जनसमुदायासमोर बोलत होत्या.
यावेळी सुषमा स्वराज यांनी म्हटले की, भाजपने अनिवासी भारतीयांविषयी जी आस्था दाखवली, ती यापूर्वी कधीच दिसली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी विदेशातील भारतीय जनसमुदायासाठी सभा घेतल्या नसल्याचे स्वराज यांनी म्हटले.
तसेच भारतीय परराष्ट्र मंत्रालय अनिवासी भारतीयांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
विदेशातील भारतीय दूतावासांसाठी मी 'होम अवे फ्रॉम होम' हे उद्दिष्ट ठरवले आहे. मात्र, केवळ बोलून ते प्रत्यक्षात साध्य होईल, असे नाही. त्यामुळे मी ट्विटरवरुन सातत्याने लोकांशी संवाद साधत असते, असे स्वराज यांनी सांगितले.