धुम्रपान करण्यासाठी कर्मचाऱ्याने 14 वर्षात 4512 वेळा घेतला ब्रेक, कंपनीने त्याच्याकडून सर्व नुकसान भरुन काढलं

Viral News: कार्यकालीन वेळेत धुम्रपान करणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने तब्बल लाखोंचा दंड ठोठावल्याची एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याने तब्बल 355 तास 19 मिनिटं धुम्रपान केल्याचं कंपनीने सांगितलं आहे.   

Updated: Mar 29, 2023, 07:51 PM IST
धुम्रपान करण्यासाठी कर्मचाऱ्याने 14 वर्षात 4512 वेळा घेतला ब्रेक, कंपनीने त्याच्याकडून सर्व नुकसान भरुन काढलं title=
(धुम्रपान करणं आरोग्यसाठी हानीकारक आहे)

An employee fined for Smoking Breaks: कार्यालयीन वेळेत धुम्रपान करण्यासाठी अनेक कर्मचारी ब्रेक घेत असतात. कंपनीत सुविधा असेल तर ठीक, अन्यथा कर्मचारी ऑफिस इमारतीच्या खाली जाऊन धुम्रपान करत असतात. दिवसातून दोन ते तीन वेळा यासाठी ब्रेक घेतला जात असल्याने त्यांचा बराच कार्यालयीन वेळ यात वाया जात असतो. मात्र जपानमध्ये अशाप्रकारे ब्रेक घेत कंपनीचा वेळ वाया घालवणाऱ्या कर्मचाऱ्याला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱी असणाऱ्या या व्यक्तीने गेल्या 14 वर्षांत तब्बल 4500 वेळा धुम्रपानासाठी ब्रेक घेतला होता. कामाच्या वेळ धुम्रपानासाठी ब्रेक घेतल्याबद्दल त्याला तब्बल 9 लाख 5 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

The Straits Times ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार, ओसाकामधील प्रशासनाने वारंवार इशारा देऊनही कामाच्या वेळांमध्ये धुम्रपान केल्याबद्दल 61 वर्षीय कर्मचारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. कंपनीने धूम्रपान केल्याबद्दल त्यांच्या पगारातून सहा महिन्यांसाठी 10 टक्के वेतन कपात लागू करत कायदा केला आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये एचआर विभागाला एका अज्ञात व्यक्तीकडून तिघेही गुपचुपपणे धुम्रपान करत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांच्या वरिष्ठाने तिघांनाही समन्स बजावलं होतं. जर तुम्ही पुन्हा धुम्रपान करताना आढळलात तर तुम्हाला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांना देण्यात आला होता. मात्र यानंतरही तिघे सतत धुम्रपान करत होते. तसंच डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या मुलाखतीत विचारलं असता त्यांनी याबद्दल खोटं सांगितलं होतं. 

ओकासामध्ये धुम्रपानासंबंधी कठोर नियम आहेत. सरकारी कार्यालयं तसंच सार्वजनिक ठिकाणी 2008 पासून धुम्रपान करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर 2019 पासून कार्यालयीन वेळेत धुम्रपान करण्यावर बंदी आहे. 

The Straits Times नुसार, 61 वर्षीय संचालक-स्तरीय वरिष्ठ कर्मचाऱ्याने स्थानिक सार्वजनिक सेवा कायद्याचं उल्लंघन केलं आहे. यामुळे कंपनीने कर्मचाऱ्याला त्यांच्या पगारातील तब्बल 9 लाख रुपये परत करण्यास सांगितलं आहे. कर्मचाऱ्याने कार्यालयीन कामकाजातील तब्बल 355 तास 19 मिनिटं धुम्रपानात वाया घालवल्याचं कंपनीने सांगितलं आहे. 

या वृत्तावर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. कार्यालयीन वेळेत चहा पिण्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा गप्पा मारण्यातही अनेकजण वेळ वाया घालवतात, पण त्याकडे कारवाईच्या दृष्टीने पाहिलं जात नाही असा युक्तिवाद एका युजरने केला आहे. तोच न्याय धुम्रपानासाठीही असला पाहिजे असा त्यांचा दावा आहे. 

ओसाकामध्ये 2019 मध्ये अशाच एका घटनेची नोंद झाली होती. एका हायस्कूलच्या शिक्षकाला त्याच्या पगारातील 10 लाख येन शिक्षण मंत्रालयाला परत करण्यास सांगितले गेले होते. कामाच्या वेळेत सुमारे 3400 वेळा धुम्पान ब्रेक घेण्यात तो दोषी आढळला होता.