Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान अनेक हादरवणारे व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओ इस्रायलच्या हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटानंतर गाझामधील सर्वात उंच टॉवर उद्ध्वस्त झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 8, 2023, 10:02 AM IST
Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार title=

Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारीच हल्ला केला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, मंत्रिमंडळाने हमास आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाची लष्करी आणि सरकारी कार्यालये नष्ट करण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दरम्यान, इस्रायलने पॅलेस्टाईन आणि हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. इस्रायलने प्रत्येक तोफ आणि लढाऊ विमाने गाझाकडे वळवली आहेत.

या प्रत्युत्तराचा पॅलेस्टाईनला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. गाझातील अनेक निवासी भागही या युद्धाचे बळी ठरले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात काही ठिकाणी संपूर्ण उंच इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. युद्धाचे थेट कव्हरेज करणाऱ्या महिला पत्रकाराच्या कॅमेरात गाझामधील सर्वात मोठ्या पॅलेस्टाईन टॉवरवर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. रिपोर्टिंग सुरु असतानाच हा हल्ला झाला आणि काही क्षणात पॅलेस्टाईन टॉवर जमीनदोस्त झाला.

 

दरम्यान, महिला पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि जमिनीवर पडली आहे. आजूबाजूच्या सर्व इमारती पाहिल्यास किती नुकसान झाले असेल याची कल्पना येऊ शकते. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या मिळालेली नाही. इस्रायली हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या युद्धविमानांनी गाझामधील दोन उंच इमारतींवर हल्ला केला. तिथे हमासचे दहशतवादी आणि हल्ल्याची उपकरणे असल्याचा आरोप इस्रायने केला.