Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा हिंसक संघर्ष आता क्षणोक्षणी गंभीर वळणावर पोहोचताना दिसत असून, आता यामध्ये जगातील महासत्ता असणाऱ्या राष्ट्रांनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. तिथं अमेरिकेनं इस्रायलला विमानवाहू जहाजं देण्याचं वक्तव्य करत युद्धात त्यांची साथ देण्याचं स्पष्ट केलेलं असतानाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक नजरा वळवणारं वक्तव्य केलं आहे.
सोमवारी न्यू हॅम्पशायर येथे एका भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी जो बायडेन यांची निंदाही केली. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांसाठी ट्रम्प यांनी जो बायडेन (Joe Biden) यांनाच दोषी ठरवलं. आपल्या नेतृत्त्वात असं काही घडलंच नव्हतं, हाच पाढा ते गिरवताना दिसले.
'आपल्या देशात बाहेरील नागरिक येऊ लागले आहेत आणि आपल्यालाही ठाऊक नाही की ते कुठून येतायत. ही तिच माणसं आहेत ज्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. तुम्हालाही ठाऊक आहे. मी बरोबरच बोलतोय ना? तुम्ही कल्पना तरी करु शकता की या माणसानं (जो बायडेन यांनी) आपल्यासोबत काय केलंय?', असं म्हणत आतापर्यंत इस्रायलवर असा हल्ला कधीच झाला नव्हता, जे झालं त्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे, या वक्तव्यावर जोर दिला.
'एनबीसी'च्या वृत्तानुसार ट्रम्प यांची वक्तव्य बहुतांशी इस्रायलवरील हल्ल्यांनंतर जाहीर करण्यात आलेल्या भूमिका आणि शनिवारी आयोबामध्ये आयोजित कार्यक्रमांदरम्यान करण्यात आलेल्या वक्तव्यांना अधोरेखित करत आहेत. यावेळी ट्रम्प यांनी इराणला $6 बिलियनच्या हस्तांतरणाचाही हवाला दिला. बायडेन आणि प्रशासनाकडून अद्यापही ही रक्कम खर्च न केली जाण्यावर वक्तव्य केली जात आहेत.
हमासकडून केले जाणारे हल्ले अपमानास्रद असून, पूर्ण ताकदीनं आत्मसंरक्षण करण्याचा इस्रायलचा हक्क आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकन करदात्यांच्या डॉलरनं या हल्ल्यांना आर्थिक पाठबळ दिलं असून, यामागं बायडेन सरकारचाच हात असल्याचा दावा त्यांनी केला. जागतिक स्तरावर घडणाऱ्या या सर्व घडामोडी आणि ट्रम्प यांचा दावा पाहता त्यावर आता बायडेन नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.