बाईकवर, घरांमध्ये तिबेटन पताका लावण्यापूर्वी जाणून घ्या त्यांचा अर्थ; यापुढे चुकीचा वापर करणं टाळाल

कधी तुम्ही याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे?   

Updated: Jun 30, 2022, 03:00 PM IST
बाईकवर, घरांमध्ये तिबेटन पताका लावण्यापूर्वी जाणून घ्या त्यांचा अर्थ; यापुढे चुकीचा वापर करणं टाळाल  title=
interesting news know the meaning of Tibetan Prayer Flags Before Hanging Them

मुंबई : भारतामध्ये सध्या प्रवासवेड्या मंडळींच्या संख्येत कमाल भर पडताना दिसत आहे. प्रवास करण्यासाठी निघालेला प्रत्येकजण त्यांच्यासोबतीनं काही गोष्टी हमखास घेऊन जातो किंवा मग प्रवास केल्यानंतर काही गोष्टी सोबत घेून येतो. यामध्ये एक गोष्ट सातत्यानं पाहायला मिळते ती म्हणजे तिबेटन फ्लॅग्स, अर्थात तिबेटन पताका. (interesting news know the meaning of Tibetan Prayer Flags Before Hanging Them)

निळा, पिवळा, पांढरा, हिरवा असे रंग असणाऱ्या रंगीबेरंगी पताकांवर काही शब्द लिहिलेले असतात. यातील काही पताकांवर इंग्रजीत लिहिलेले शब्द सहजपणे वाचता येतात पण, त्याव्यतिरिक्त त्यावर लिहिलेलं फार काही कळत नाही. 

तरीही प्रत्येक फिरस्त्याकडे अशा पताकांची किमान एक माळ तरी असतेल. बाईकवर लावण्यापासून ते घरातही शोभेच्या ठिकाणी ही माळ लावली जाते. पण, कधी तुम्ही याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? 

या पताका साध्यासुध्या नाहीत. तर तिबेटन संस्कृतीमध्ये त्यांचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागांमध्ये, नेपाळमध्ये या पताका मोठ्या प्रमाणावर पाहता येतात. 

हवा (पांढरा रंग), पाणी (हिरवा रंग), अग्नी (लाल रंग), वाऱ्याचा झोत (निळा रंग) आणि पृथ्वी (पिवळा रंग) या घटकांचं प्रतिक म्हणून या पताकांचे असे रंग असतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य या दिशा म्हणूनही या रंगीत पताकांकडे पाहिलं जातं. 

तिबेटन बौद्ध संस्कृतीमध्ये या पताकांना फार महत्त्वं आहे. काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार तिबेटच्या लोकांनी युद्धादरम्यान संरक्षणासाठी त्यांचा वापर केला होता. ज्यानंतर त्याच्यावर प्रार्थना आणि शांततेचे संदेश लिहिण्यात येऊ लागले. 

तिबेटमध्येच प्रचलित असलेला 'ओम मनी पद्मे हूँ' हा मंत्र या पताकांवर लिहिलेला असतो. बुद्धाने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा संदेश या मंत्रातून मिळतो. शांतता, संयम, संस्कार अशा शिकवणींचा त्यात समावेश असतो. त्याशिवाय देवाकडे आपल्याकडून अजाणतेपणे घडलेल्या अपराधांची क्षमा मागत जे सुख आपल्याला मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणूनही हा मंत्र जपला जातो. 

या पताका टांगल्या का जातात ? 
या रंगीबेरंगी पताका टांगल्या जाण्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर वाऱ्याचा झोत आल्यानंतर त्यातून सकारात्मक आध्यात्मिक तरंग तयार होतात. हवेच्याच माध्यमातून ते शांत आणि संथ प्रार्थनांचं काम करतात. या पताका कधीच जमिनीवर ठेवल्या जात नाहीत. म्हणूनच त्या ठराविक उंचीवर टांगल्या जातात. 

पताकांचा रंग फिका पडल्यास... 
या पताकांवरील रंग फिके पडू लागल्यास ही शुभसूचक घटना समजली जाते. वाऱ्याचा झोत तुमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवत असल्याचं हे प्रतीक समजलं जातं. 

या पताका भेट स्वरुपात मिळाल्यास त्यांचं महत्त्वं अधिक वाढतं. त्यामुळं तुम्हाला कुणी लेह- लडाख, स्पिती, भूटान किंवा हिमाचलहून येताना या पताका भेट म्हणून आल्या तर तो आशीर्वादच समजा...