इस्त्रायलमध्ये हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान भारतीयांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे. इस्त्रायलमध्ये अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. हे तिघेही भारतीय केरळचे रहिवासी आहेत. लेबनानमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हा हल्ला केला आहे.
इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे की, इस्त्रायलमधील सध्याची स्थिती पाहता तिथे राहणारे सर्व भारतीय नागरिक आणि खासकरुन सीमाभागात परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देशातील सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जात आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी भारतीय दुतावास इस्त्रायल सरकारच्या संपर्कात आहे. या पोस्टमध्ये भारतीय दुतावासाने मदतीसाठी हेल्पलाईन आणि ई-मेल आयडी दिला आहे.
इस्त्रायलमध्ये अँटी टँक मिसाइल हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. उत्तर इस्त्रायलच्या सीमेवर सोमवारी एका बागेवर दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय नागरिक ठार झाला असून, त्याची ओळख 31 वर्षीय पॅट निबिन मॅक्सवेल अशी झाली आहे. मॅक्सवेल जवळपास 2 महिन्यांपूर्वी इस्त्रायलमध्ये आला होता. तिथे एका शेतात तो मजुरीचं काम करत होता.
मॅक्सवेलच्या मागे त्याची पत्नी आणि 5 वर्षांची मुलगी आहे. त्याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या इतर दोन भारतीयांची ओळखही पटली असून, बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी झाली आहे.
उत्तर इस्त्रायलमध्ये सीमेवर गॅलील परिसरात एका बागेत सोमवारी सकाळी जवळपास 11 वाजता हल्ला झाला. या मिसाईल हल्ल्यात जॉर्ज होरपळला होता. त्याला जखमी अवस्थेत बेलिनसन रुग्णालयात दाखल करण्यात आलं . त्याचा चेहरा भाजला असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
तर मेल्विनही जखमी असून, त्याच्यावर जिव्ह रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो केरळच्या इडुक्कीचा राहणारा आहे. हा हल्ला लेबनानच्या हिजबुल्लाहने केल्याचं मानलं जात आहे. 8 ऑक्टोबरनंतर इस्त्रायलवर सतत रॉकेट, मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरु आहे. हमासने इस्त्रायलवर 5 हजारापेक्षा जास्त रॉकेट डागले आहेत. यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली होती. इस्त्रायल आणि हमासमधील युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.