हनोई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव पाहता जगभरात चिंतेचं वातावरण आहे. दोघांमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. दोन्ही देशांमध्ये बैठकांवर बैठका होत आहे. क्षणाक्षणाला सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. हे सगळं घडत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे जगभरात चर्चांना उधाण आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून लवकरच चांगली बातमी येणार आहे. दोघांमधला तणाव लवकरच संपणार आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, अमेरिका यामध्ये मध्यस्थीची भूमिका पार पाडत आहे. व्हिएतनाममध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, ''मला वाटतं की, भारत पाकिस्तानमधून लवकरच चांगली वार्ता येणार आहे. दोन्ही देशांमधील गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला तणाव लवकरच संपणार आहे. यासाठी अमेरिका मध्यस्थी करत आहे. आम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. आशा आहे की लवकरच हा तणाव दूर होईल.'
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाच्या सीमेत घुसून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले होते. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर पाकिस्तानी वायुदलाने देखील बुधवारी भारतीय हवाईसीमेचं उल्लंघन केलं होतं.
बुधवारी रात्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांच्यासोबत चर्चा केली. भारताने दहशतवादा विरोधात जी कारवाई केली ती योग्य असून या लढाईत ते भारतासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प हे सध्या व्हियतनाममध्ये आहेत. उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन सोबत ते शिखर वार्ता करत आहेत. दोन्ही देशांमध्ये ही दुसरी शिखर वार्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये देखील तणावाचं वातावरण होतं.