'कंगाल' पाकिस्तानमध्ये सोनं आणखी महाग; किंमत ऐकून बसेल धक्का

पाकिस्तानमधील सोन्याच्या किंमती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...

Updated: Dec 14, 2019, 03:42 PM IST
'कंगाल' पाकिस्तानमध्ये सोनं आणखी महाग; किंमत ऐकून बसेल धक्का  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : उपासमार, महागाई आणि गरिबीने पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पाकिस्तानमध्ये भाज्या, पेट्रोल-डिझेलनंतर आता सोन्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. येथील सोन्याचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल... पाकिस्तानी रुपयाची डॉलरच्या तुलनेत सतत घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सतत चढाच आहे. पाकिस्तानमधील सोन्याचा भाव भारताच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. तेथील स्थानिक बाजारात सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी जवळपास ८४ हजार ४०० पाकिस्तानी रुपये इतका आहे. तर भारतीय बाजारात सोन्याचा दर जवळपास ३८ हजार ८७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने स्थानिक बाजारातही किंमत वाढत आहे. जर अशाच प्रकारे सोन्याच्या किंमतीत वाढ होत राहीली तर पाकिस्तानात लवकरच सोन्याचा दर १ लाख रुपयांवरही पोहचू शकतो. काही दिवसांपूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ९० हजार पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहचली होती. 

पाकिस्तानवर कर्जाचा बोझा वाढतच आहे. त्याचा परिणामही सोन्याच्या किंमतींवर होताना दिसतो आहे. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापारसंबंधी तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या बाजारात याचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला. 

जगभरात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम पकिस्तानवरही होताना दिसतोय. परंतु पाकिस्तानी रुपयाची सतत होत असलेली घसरण पाहता तेथे महागाई अधिक वाढतेय. पाकिस्तानी रुपयांच्या खराब स्थितीमुळे येथील लोक महागाईने त्रस्त झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये काही वर्षांपूर्वी सोन्याची मागणी दररोज जवळपास १० हजार तोळा इतकी होती. परंतु आता सोन्याच्या मागणीत चांगलीच घट झाली असून मागणी केवळ २ ते ३ हजार तोळा असल्याची माहिती मिळत आहे.