Global Water Cycle System: आधुनिकीकरणाच्या मागे धावणारं जग एकिकडे कमाल प्रगती करत असतानाच दुसरीकडे मात्र संकटाच्या गर्त छायेत येताना दिसत आहे. कारण, ठरताहेत अनेक मानवी कृती. मानवाच्या उत्पत्तीनंतर पहिल्यांदाच पृथ्वीवरील पाणीपातळी आणि जलचक्राचं संतुलन बिघडलं असून, त्याचे थेट परिणाम जीवसृष्टीवर होताना दिसणार आहेत.
पृथ्वीवरील जलचक्राचं संतुलन बिघडलं असून, ही एक अशी प्रणाली आहे, ज्यामुळं संपूर्ण पृथ्वीवर पाण्याचा स्त्रोत वाहताना दिसतो. 'ग्लोबल कमीशन ऑन द इकॉनमिक्स ऑफ वाटर'च्या एका निरीक्षणपर अहवालाच्या माध्यमातून जाणकारांनी जारी केलेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील जलचक्राच्या असंतुलनाचे परिणाम जीवसृष्टीवर होणार असून, परिणामी जागतिक अर्थव्यवस्थासुद्धा कोलमडतील, अन्नधान्य, उत्पादनांची नासाडी होईल.
पृथ्वीवरील जलचक्र ही एक अशी प्रणाली आहे, जिथं पाणी पृथ्वीच्या चारही बाजूंना फिरतं. भूगर्भातून पृथ्वीच्या पृष्ठावर येणारं हे पाणी झरे, नद्यांमध्ये येतं. अनेकदा वनस्पतींमध्येही पाण्याचा अंश आढळतो. यानंतरच्या टप्प्यात पाण्याचं बाष्पीभवन होऊन वातावरणातही त्याचा वावर असतो, यातूनच पुढे पाऊस पडतो. पाण्याचं तापमान आणखी कमी झाल्यास अखेर त्याचा बर्फ होतो आणि पुन्हा हे पाणी स्थायू रुपात जमिनीवर येऊन द्रवरुप धारण करत जमिनीत एकरुप होतं.
नुकत्याच करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार आधुनिकीकरणावरील नियंत्रणाचा अभाव आणि पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळं जलचक्रावर प्रचंड ताण आला अहे. ज्यामुळं सध्याच्या घडीला जवळपास तीन अब्ज लोकसंख्येला पाण्यापासून वंचित रहावं लागत आहे, अनेक ठिकाणी शेतातलं पिक विनाशाच्या दिशेनं जात असून, शहरंही आकुंचन पावताना दिसत आहेत.
तातडीनं या संकटावर तोडगा निघाला नाही, तर येत्या काळात वैश्विक खाद्य उत्पादनानमध्ये 50 टक्के नुकसानाची शक्यता आहे. इतकंच नव्हे, तर 2050 पर्यंत सर्वच देशांच्या जीडीपीमध्ये सरासरी 8 टक्क्यांनी घड होऊ शकते. तर किमान उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हा आकडा जवळपास दुप्पट अर्थात 15 टक्के असू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.