नवी दिल्ली : मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेल्या नासाच्या 'क्युरोसिटी रोवर'ला आता पाच वर्ष उलटलीत. ग्रहावर जीवन असल्याच्या अनेक शक्यतांची पडताळणीही करण्यात आलीय. याच मिशनमध्ये एका मूळ भारतीय महिलेचा महत्त्वाचा वाटा आहे. ही महिला म्हणजे एअरोस्पेस इंजिनिअर अनिता सेनगुप्ता... मूळची पश्चिम बंगालची असलेली अनिता एक भारतीय-अमेरिकन सायन्टिस्ट आहे. अनिताला नासामध्ये 'जिनिअस' म्हणून ओळखलं जातं. ब्रम्हांडात सर्वात थंड ठिकाण बनवण्यासाठी नासाच्या भौतिक प्रयोगावर कामही अनितानं केलंय... याच अनिताच्या हातात आता एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे.
अनिता सेनगुप्तानं दक्षिणी कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात विटरबी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एअरोस्पेस आणि मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवलीय. ती नासाच्या 'स्टार एम्प्लॉई'पैंकी एक आहे.
Your primer for #coldatomlab from yours truly, cold atoms and hyperloops have physics in common. https://t.co/zEisByGRKL
— Dr. Anita Sengupta (@Doctor_Astro) May 21, 2018
सध्या अनिता वर्जिन हायपरलूप वनमध्ये सिस्टम्स इंजिनिअरिंगची उपाध्यक्ष म्हणून काम पाहतेय. एका व्हॅक्युम ट्युबमध्ये ११२३ किलोमीटर प्रती तास धावण्याची क्षमता असेल. त्यामुळे काही तासांऐवजी काही मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे. टेस्ला कंपनीचे सहसंस्थापक इलोन मस्कनं पहिल्यांदा हायपरलूपची आयडिया दिली होती. त्यानंतर याच्याशी निगडीत अनेक योजनांवर काम सुरू झालं. या प्रोजेक्टची सुरुवात करणारीही अनिता सेनगुप्ता याच होत्या.
मॅग्नेटिक लेविटेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं एका व्हॅक्युम ट्युबमध्ये ट्रेन चालविली जाऊ शकते, हे संपूर्ण जगानं पाहिलं. भविष्यात ही एक क्रांतिकारी गोष्ट ठरू शकते.
अनिता यांच्या म्हणण्यानुसार, हायपरलूप एक मॅग्लेव ट्रेन आहे जी व्हॅक्युम ट्युबमध्ये चालेल. सध्या लोक प्रवासासाठी जसा विमानाचा वापर करतात तसाच वापर भविष्यात मॅग्लेव ट्रेनचाही होऊ शकेल. अनिताच्या मते, हायपरूप वन प्रोजेक्ट सुरक्षा टेस्टमध्ये यशस्वी ठरणार आहे आणि २०२१ पर्यंत व्यावसायिक स्वरुपात याचं कामही सुरू होईल.