मुंबई : महाराष्ट्र राज्यात जोरदार मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर मुंबईत जोरदार पावसात शहर तुंबण्याचा प्रकार अनेकवेळा पाहिला असेल. तर 26 जुलै 2005 ला मुंबई जलमय झाल्याने बुडाली होती. अनेकांचे हाल झाले होते. अशीच परिस्थिती आता प्रचंड पावसामुळे चीनमध्ये दिसून येत आहे.
चीनमधील पुराने (Flooded China) लोकांचे झाल झाले आहेत. पावसाने आणखी तीव्र स्वरुपाचे रूप धारण केले असून त्यामुळे रस्त्याला समुद्राचे रुप आले आहे. परिस्थिती अशी आहे की सर्वत्र पाणी तुंबले आहे आणि लोकांची हालचाल करणे कठीण झाले आहे. पुरामुळे रस्ते इतके भरुन गेले आहेत की वाहने वाहताना दिसू लागली आणि मेट्रो स्टेशन पाण्याचे तलाव झाले असून स्टेशन बुडताना दिसत आहेत.
मोठ्या पुरामुळे लोक भुयारी रेल्वे स्थानक आणि शाळांमध्ये अडकले आहेत. अनेक वाहने वाहून गेली होती आणि बर्याच लोकांना त्यांच्या कार्यालयात रात्री मुक्काम करावा लागला. चीन सरकारच्या सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हेनान प्रांताची राजधानी झेंगझोऊ येथे मंगळवारी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान सुमारे 20 सेंटीमीटर पावसाने पूर आला.
मुसळधार पावसामुळे रस्ते नद्यांमध्ये बदलले आणि सबवे स्टेशन पाण्याने भरून गेलीत. एका व्हिडिओमध्ये समोर आले आहे की, शहर पाण्याने भरलेले दिसत आहे आणि त्यात वाहने तरंगताना दिसत आहेत.
चीनमध्ये पूर-संबंधित अपघातात किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर बससेवा बंद ठेवण्याची परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, 80 हून अधिक बसगाड्या ठप्प झाल्या असून मेट्रो सेवाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. भुयारी रेल्वेच्या बोगद्यात खराब पाणी साचले आहे, मेट्रोच्या आतही पाणी शिरले आहे, त्यानंतर लोकांना पाण्यातून प्रवास करण्यास भाग पाडले आहे.
बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिसांपासून अग्निशमन दलाकडे आणि स्थानिक प्रशासनापर्यंतचे पथक रात्रंदिवस काम करत आहेत. याशिवाय या पावसामुळे हवाई सेवेवरही परिणाम झाला असून 260 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
बुधवारी रात्री हेनान प्रांतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय हेनानची राजधानी झेंगझोउ येथे पूरानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.